काँग्रेसचा जोर बैठकांवर ! कार्यकर्त्यात जोश निर्माण करण्याचे आव्हान

Foto

 औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते काहीसे सैरभैर झाले आहेत. या कार्यकर्त्यांत आलेली मरगळ झटकून विधानसभेसाठी पुन्हा चैतन्य निर्माण करण्याचे मोठे आव्हान शहराध्यक्ष नामदेवराव पवार व  जिल्हाध्यक्ष अनिल पटेल यांच्यावर आहे. गांधी भवनात दररोज बैठकांचा सिलसिला सुरू असून विधानसभेच्या जागा काँग्रेस जिंकेल असा विश्वास पवार यांनी बोलून दाखविला.

 लोकसभा निवडणुकीत गटबाजीने पोखरलेल्या काँग्रेस पक्षाला अखेर पर्यंत ताकद दाखविता आली नाही. परिणामी आ. सुभाष झांबड यांचे डिपॉझिट जप्त झाले. तत्कालीन जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याने जिल्हा काँग्रेस काहीशी अस्वस्थ दिसून आली.  लोकसभेचा पराभव आणि संघटनेतील फेरबदल यामुळे पक्षाची घडी काहीशी विस्कळीत झाली होती. मात्र, आता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी औरंगाबाद शहरातील तीन विधानसभा मतदारसंघाची धुरा नामदेवराव पवार यांच्याकडे तर ग्रामीण भागातील तीन विधानसभा मतदार संघाची धुरा जिल्हाध्यक्ष अनिल पटेल यांच्याकडे सोपविली आहे. त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून शहागंजच्या गांधी भवनात पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची रेलचेल दिसून येत आहे. काँग्रेसचे संघटन तळागाळापर्यंत आहे. प्रत्येक समाजाचे संघटन असल्याने समाजवार बैठकांचा सिलसिलाच गांधी भवनात सुरू झाला आहे. ओबीसी, अल्पसंख्यांक, आदिवासी यासह प्रत्येक सेलच्या वेगवेगळ्या बैठका घेऊन विधानसभेची जोरात तयारी सुरू झाल्याचे पदाधिकारी सांगतात. लोकसभेची निवडणूक वेगळ्या विषयावर लढली गेली तर आता विधानसभेची निवडणूक स्थानिक विषयांवर लढवली जाणार असल्याने काँग्रेस पुन्हा मजबूत स्थितीत येईल आणि सर्व जागा जिंकेल असा दावा कार्यकर्ते करीत आहेत.

 जातीवादाची विष धुवून काढा : पवार
 लोकसभा निवडणुकीत भाजपा ने जातीयवादाचा वादाचे विष कालवले असा आरोप शहराध्यक्ष नामदेवराव पवार यांनी केला आहे. हे विष धूवून काढण्याची जबाबदारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी उचलावी.  सर्व समाजांना सोबत घेऊन विधानसभेच्या निवडणुका लढवाव्या यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्षाकडे विधानसभेसाठी उमेदवारांची मुळीच कमतरता नाही, एका दिलाने काम करून विजय खेचून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.