सभेला येणाऱ्या गाड्या पंक्चर झाल्या की काय,
काँग्रेसच्या जनसंघर्ष सभेत आमदार सत्तारांना पडला प्रश्न
औरंगाबाद – काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रा
तिसऱ्या टप्प्याच्या समारोप सभेला आपेक्षित गर्दी न जमल्यामुळे सभेला येणाऱ्या
गाड्या पंक्चर झाल्या की काय असा सवाल आयोजक आमदार अब्दुल सत्तार यांना पडला होता.
काँग्रेसच्या मराठवाड्यातील जनसंघर्ष यात्रा आणि जनसंपर्क अभियानाची समारोप सभा
शुक्रवारी (ता. १) येथील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर आयोजित करण्यात आली होती.
सभेची नियोजित वेळ दुपारी चार वाजताची होती, मात्र सायंकाळी सहा पर्यंत २५ टक्केही
मैदान भरलेले नव्हते, हे चित्र पाहून कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी असलेले
काँग्रेसचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांना आता
सभेचा फज्जा उडणार असे वाटत होते. त्यामुळे त्यांनी मंचावरुनच कार्यकर्त्यांना
सावल केला, की सभेला येणाऱ्या गाड्या तिकडेच पंक्चर झाल्या की काय?
तब्बल अडीच तास उशिरा सभेला सुरुवात झाली आणि ५०
– ७५ टक्के मैदान भरले. सभेला ५ ते ७ हजार लोक उपस्थित होते. मराठवाड्याच्या जनसंघर्ष
यात्रा समारोप सभेला काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे, राज्यसभेतील
विरोधीपक्ष नेते गुलामनबी आझाद, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री
खासदार अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, युवक काँग्रेस
अध्यक्ष सत्यजीत तांबे, श्रीमती शेळके, आमदार राजूरकर उपस्थित होते.
गुलाम नबी आझाद म्हणाले, भाजप सत्तेत आली आहे,
याचे आम्हाला दुःख नाही. भाजप आणि मोदींसोबत आमचे वैचारिक मतभेद आहेत, ते
राहाणारच. मात्र ते सत्तेत आले ते जनतेला खोटे बोलून. त्यांनी जेवढी आश्वासने दिली
ती आज जुमलेबाजी ठरत आहे. काळापैसा भारतात आणण्याचे आश्वासन दिले होते मात्र नीरव
मोदी, मेहुल चौकसी आणि विजय माल्ल्या यांच्यामार्फत व्हाईट मनीही त्यांनी
भारताबाहेर पाठवला, असा घणाघात आझाद यांनी केला.











