औरंगाबाद – रेशन दुकानदारांच्या मंचावर काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रल्हाद मोदी यांच्यांत खडाजंगी झाली. स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी औरंगाबादमध्ये मोर्चा काढण्यात आला. आमखास मैदानावर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी विविध राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीनां रेशन दुकानदार संघटनांनी पाठिंब्यासाठी निमंत्रित केले होते. काँग्रेसचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणातून नोटबंदीचा केलेला उल्लेख प्रल्हाद मोदींना झोंबला आणि त्यांनी आपल्या भाषणातून सत्तार यांच्यावर पलटवार केला. तेव्हा सत्तार यांनी मोदींना अपशब्द वापरत मंच सोडला.
नेमके काय घडले
स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्यावतीने
आयोजित सभेला ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेशनचे प्रल्हाद मोदी, आमदार
अब्दुल सत्तार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कृष्णा डोणगावकर, जिल्हा परिषदेच अर्थ
आणि बांधकाम सभापती विलास भुमरे, शिवसेनचे संतोष
माने उपस्थिती होते. आमदार अब्दुल सत्तार यांनी रेशन दुकानदारांच्या प्रश्नांसाठी
अहमदाबादहून आलेल्या प्रल्हाद मोदींचे स्वागत केले. ते म्हणाले, ‘सत्तेच्या बाजूने लढण्यासाठी खूप मोठी हिम्मत
लागते. ही हिम्मत प्रल्हाद मोदींमध्ये आहे.’ आमदार सत्तार म्हणाले, प्रल्हाद मोदींच्या
रूपाने सर्वसामान्यांसाठी लढणारे खरे मोदी आज जनतेसोबत आले आहेत. आमदार सत्तार यांनी रेशन दुकानदारांच्या सर्व मागण्यांना आमचा
पाठिंबा असल्याचेही जाहिर केले. त्याचवेळी सत्तार यांनी मंचावर उपस्थित
शिवसेनेच्या नेत्यांना चिमटा काढला. ते म्हणाले, सत्तेत राहून कायदे करायचे आणि बाहेर
जनतेसोबत येऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत असेही सांगायचे. जर तुम्हाला
रेशनदुकानदारांवरील अन्याय मान्य नसेल तर सत्तेतून बाहेर पडा. त्यासोबतच सत्तार
यांनी शिवसेनेत आदेश चालतो, येथे उपस्थित शिवसेनेचे नेते जर पक्षश्रेष्ठींच्या
आदेशाने आले असतील तर ठिक अन्यथा त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, अशी कोपरखळीही
मारली.
सत्तार यांनी आपल्या भाषणात नोटबंदीचा उल्लेख
केला. ते म्हणाले, नोटबंदीमुळे गोरगरिबांचे मोठे नुकसान झाले. येथे कोणीही कायमचे
सत्तेत राहात नाही. मोगलांपासूनची उदाहरणे देत सत्तार यांनी काँग्रेसच्या काळाताही
काही चुका झाल्या त्यामुळे त्यांना जनतेने सत्तेतून बाहेर काढले, असे सांगत
मोदींनाही २०१९ मध्ये जनतेच्या प्रश्नांना उत्तरे द्यावे लागतील असे सांगितले.
सत्तार यांच्यानंतर सभेला संबोधित करताना प्रल्हाद मोदी यांनी आमदार सत्तार यांच्यावर टीकेची झोड उठवली. रेशनदुकानदारांवर आज मोर्चा काढण्याची वेळ आली ती काँग्रेसच्या काळातील धोरणांमुळेच. यूपीएच्या काळातच तुमच्या अधिकाऱ्यांच्या डोक्यातून डीबीटी निघाले होते. त्याला आता भाजपने फक्त अनुमोदन दिले आहे. तेव्हा तुमच्या सरकारने डीबीटीला कोर्टात का विरोध केला नाही, असा सवाल त्यांनी केला. त्यासोबतच हा मंच रेशनदुकानदारांच्या प्रश्नांचा आहे. येथे राजकीय टोलेबाजी करुन आमच्यामध्ये भांडण का लावता, असा सवाल मोदींनी केला. नोटबंदी आणि जीएसटीचा मुद्दा येथे उपस्थित करण्याची गरज नाही. नोटबंदीनंतर उत्तर प्रदेशची निवडणूक झाली तिथे तुमचा सुपडा साफ झाला, असे म्हणताच सत्तार यांनी मंचावरुन काढता पाय घेतला. आयोजकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतू ते तावातावने तेथून निघाले. त्यांच्या पाठोपाठ शिवसेनेच्या नेत्यांनीही मंचावरुन जाणे पंसत केले. नेत्यांच्या या राजकीय भाषणबाजीने रेशनदुकानदारांचे प्रश्न मात्र बाजूला राहिले.










