औरंगाबाद : काँग्रेस आघाडीचे काय चाललेय, याबाबत नेतेच आता बोलायला तयार नाहीत. औरंगाबाद लोकसभेची जागा काँग्रेस लढविणार की राष्ट्रवादी काँग्रेस, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. अतिशय अनुकूल स्थितीत असलेल्या काँग्रेसला वेळकाढूपणाचा शाप आहे. ऐनवेळी उमेदवारी जाहीर करून आपल्याच पायावर धोंडा पाडण्याची ‘शेखचिल्ली नीती’ कधी संपणार, असा सवाल सामान्य कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत. आम्हाला जे कळते ते वरिष्ठांना कळू नये का, असाही सवाल कार्यकर्ते करतात.
निवडणुकीपूर्वी जोश आणि होश निर्माण करीत वातावरण निर्मिती करणे काँग्रेस आघाडीला नेहमीच जमते. याहीवेळी वॉर्डनिहाय बैठकांचे सत्र वर्षभरापासून सुरू आहे. वेगवेगळ्या जाती-धर्मांच्या बैठका, त्यांचे संघटन आणि कार्यकर्त्यांमधील एकजिनसीपणा अगदी योग्य पद्धतीने निर्माण करण्यात कधी नव्हे ते दोन्ही काँग्रेसला यश मिळाले. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुका जिंकल्याने काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली. आता केंद्रात आपलीच सरकार येणार, असा ठाम विश्वास काँग्रेसी कार्यकर्ते बोलून दाखवित आहेत. या कार्यकर्त्यांचा जोश कायम कसा राहील, याची चिंता वरिष्ठांनी केलेली नाही. त्यामुळेच अगदी रस्त्यावर उभा सर्वसामान्य कार्यकर्ता जोश गमावत चालला आहे. कधी एकदाचा उमेदवार जाहीर होतो याकडे तो डोळे लावून आहे. मात्र, राजकीय साठमारीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला येते की नाही हेही अद्याप निश्चित नाही. हजारो कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास करून आपण बेहोश असल्याचा पुरावाच वारंवार नेते मंडळी देते, असा आजवरचा अनुभव आहे.
काँग्रेसची जय्यत तयारी
गेल्या वर्षभरापासून विविध आणि आक्रमक आंदोलनाद्वारे आघाडीने जिल्ह्यात चांगली वातावरण निर्मिती केली. शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर, कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या आदी प्रश्नांवर अनेक आंदोलने वर्षभराच्या काळात झाली. कधी नव्हे ते एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते एका व्यासपीठावर दिसले. 8 पान 8 वर
खैरेंचा प्रचार सुरू
दुसरीकडे शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराने प्रचाराला प्रारंभही केला आहे. खा.चंद्रकांत खैरे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. प्रचार कार्यालये, प्रचारकांच्या नियुक्त्या, कार्यकर्त्यांना जबाबदारीचे वाटप करण्यात येत आहे. शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. या सर्व कामांना अवधी मिळाला की, निवडणुकीत लाभ मिळणार, यात शंका नाही. अशा वेळी काँग्रेसचे नेमके चालले तरी काय, असा सवाल कार्यकर्तेच विचारू लागले आहेत. या नेत्यांची एकजूट कार्यकर्त्यांना ताकद देऊन गेली. या एकजुटीला बळ देण्यासाठी काँग्रेसने उमेदवाराची घोषणा तातडीने करायला हवी होती. असे झाले असते तर अर्धेअधिक मैदान आताच जिंकले गेले असते. मात्र, अजून कशातच कशाचा पायपोस नाही. काँग्रेसच्या याच धोरणाचा लाभ शिवसेना-भाजपच्या उमेदवाराला होतो.
अनेकांना उमेदवारीचे डोहाळे
काँग्रेस पक्षात अनेक जणांनी लोकसभा निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. आमदार सुभाष झांबड, प्रा. रवींद्र बनसोड, शहराध्यक्ष नामदेवराव पवार यांच्यासह अमिता चव्हाण, आ. अब्दुल सत्तार, डॉ. कल्याण काळे यांचीही नावे चर्चेत आहेत. विशेष म्हणजे इच्छुक उमेदवार एकमेकांच्या विरोधात थेटपणे उतरल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. दुसरीकडे हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या पारड्यात पडावा, यासाठी आ. सतीश चव्हाण फिल्डिंग लावून आहेत. दोन महिन्यांपूर्वीच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आ. चव्हाण यांचे नाव पुढे केले होते. आता अहमदनगर आणि औरंगाबादच्या जागांची अदलाबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.