औरंगाबाद: लोकसभा निवडणुकीनंतर औरंगाबादेतील राजकारणाचा वाढलेला पारा काही केल्या उतरत नाहीये. महापालिकेत झालेल्या प्रचंड राड्यानंतर आता काँग्रेस नगरसेवक अफसर खान यांनी नवनिर्वाचित खा. इम्तियाज जलील यांच्या विरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर तक्रार दाखल केली आहे.
इम्तियाज जलील यांनी आपल्याला चिरडून मारण्याची धमकी दिल्याचे अफसर खान यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत त्यांनी औरंगाबादचे पोलीस आयुक्तांना तक्रार दिली असून या तक्रारीनंतर औरंगाबादच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या विजयी रॅलीमध्ये आता आपण पाच वर्षांसाठी खासदार असून आपल्याविरुद्ध काम करणाऱ्यांना चिरडून टाकू असे इम्तियाज जलील यांनी म्हटल्याचा आरोप अफसर खान यांनी केला आहे. याबाबत आपण पोलीस आयुक्त तसेच पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून याबाबत आपण लोकसभा अध्यक्षांना भेटणार असल्याचेही अफसर खान यांनी म्हटले आहे.











