नवीन पाणीपुरवठा योजनेची चौकशी करा, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची मागणी

Foto


छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी मंजूर केलेल्या ७५० कोटींच्या योजनेच्या पुनर्निविदा काढण्यात आल्या. आता २७४० कोटींवर गेली आहे. शहरातील मंत्री अतुल सावे, मंत्री संजय शिरसाट यांचा अधिकार्‍यांवर तसेच जीव्हीपीआर कंपनीवर दबाब होता का? या मंत्र्यांनी पुनर्निविदा का करायला लावल्या, असे अनेक प्रश्न उपस्थित करत, या सर्व प्रकरणाची प्रामाणिक अधिकार्‍यांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सोमवारी (दि.२३) पत्रकार परिषदेत केली. 
लोंढे म्हणाले की, एकीकडे महागाई कमी झाल्याचा दावा भाजप सरकार करत आहे, तर मग या योजनेचा खर्च वाढत वाढत २७४० कोटींपर्यंत कसा गेला? याचे उत्तर मंत्री सावे आणि मंत्री शिरसाट यांनी द्यावे. थर्ड पार्टी इन्स्पेक्शनचे आदेश असतानाही, पोलीस आणून काम पुढे सुरू करण्यात आले. पोलिसांनी बळाचा वापर केला. पोलीस अधिकार्‍यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या प्रकरणी न्यायालयात हस्तक्षेप अर्ज पक्षाच्या वतीने दोन दिवसात सादर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला खासदार डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष किरेंण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष शेख युसूफ, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. इकबालसिंग गिल, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके, माजी नगरसेवका भाऊसाहेब जगताप, विशाल बन्सवाल आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.