नवी दिल्ली : इंडिया आघाडीने पुन्हा एकदा राजधानी दिल्ली दणाणून सोडण्याचा संकल्प केला आहे. १ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या ऐतिहासिक रामलिला मैदानावर आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. जंतरमंतर हे आंदोलनाचे स्थळ नसेल. तर रामलिला मैदानावर एसआयआर, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात एल्गार पुकारला जाणार आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी भाजप आणि संघ परिवाराला एक उपरोधिक टोला लगावला आहे.
१ नोव्हेंबर रोजी होणार्या आंदोलनाच्या अगोदर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी भाजपला उपरोधिक टोला लगावला आहे. राहुल गांधी म्हणाले की, मी भाजपचे मनापासून आभार मानतो. कारण त्यांनी आमच्या विचारसरणीला देशाच्या कानाकोपर्यात आणि प्रत्येक घराघरात पोहचवण्याचे काम अगदी मोफत केले आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी हे अत्यंत आक्रमक आंदोलन करत आहेत. त्यांनी काँग्रेसमध्ये नव संजीवनी आणण्यास सुरुवात केली आहे. संघटनात्मक स्तरावरही मोठा बदल केला आहे. तर आता रस्त्यावरच्या लढ्यातही मोठे नेते उतरत असल्याने मोठ्या बदलाला सुरुवात झाल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मत आहे.
आम्ही जनतेचे प्रश्न मांडत राहू
इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपसह समविचारी संस्थांवर हल्लाबोल केला. भाजप आमच्यावर कितीही टीका करो. आवाज दाबण्याचा प्रयत्न करो. आम्ही आमची विचारसरणी आणखी वेगाने जनतेपर्यंत पोहचवू. तुम्ही आमच्या विचाराला, विचारसरणीला जितका विरोध कराल, तितकेच लोक आमच्याशी जोडले जातील, असे त्यांनी सत्ताधार्यांना सुनावले. कितीही दबावाचे राजकारण केले तरी आम्ही जनतेचे प्रश्न मांडत राहू असे त्यांनी ठणकावले.
बैठकीत सरकारविरोधात मोठी रणनीती
इंडिया आघाडीच्या या बैठकीत इतर महत्त्वाच्या नेत्यांनीही सरकारविरोधात सूर आळवला. महागाई, बेरोजगारी, शेतकर्यांचे प्रश्न, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर या मुद्यांवरून त्यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. घटक पक्षांनी राज्य घटना आणि लोकशाही धोक्यात आल्याचे म्हटले. आगामी काळात सर्वच पक्षांनी एकत्र येत दडपशाहीविरोधात आवाज उठवण्याचा नारा दिला.