औरंगाबाद- देशात झालेल्या मोठ्या घोटाळ्यापैकी बोफोर्स, कोळसा, अगस्ता वेस्टलँड यासह आता राफेल कराराचेही नाव जोडले गेले आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून काँग्रेसला नाकारलेल्या जनतेला मोदी सरकारही भ्रष्टाचारी असल्याचा घोषा काँग्रेसने लावला आहे. राफेल प्रकरणावरून देशभर रान उठलेले असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल शहरात राफेल करारासंबंधी विस्तृत माहिती देणारे व्याख्यान सादर केले. शहरवासीयांसाठी नव्या असलेल्या दोन संस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अराजकीय कार्यक्रम असल्याचे सांगत नागरिकांना या व्याख्यानाकडे आकर्षीत करण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरला.
राफेल या लढाऊ विमानाच्या खरेदीत मोदी सरकारने भ्रष्टाचार केल्याचा आरोप काँग्रेस करीत आहे तर देशाच्या संरक्षणासाठी काँग्रेसने दहा वर्ष विमानांची खरेदी केली नाही असा आरोप भाजप कडून केला जातो. देशाच्या संरक्षणासारख्या गंभीर विषयावर दोन प्रमुख पक्षातील वादावादी उबग आणणारी आहे. चव्हाण यांनी दोन तास विस्तृत विवेचन केल्यानंतरही उपस्थितांच्या प्रश्नाची उकल होऊ शकली नाही. त्यामुळे कार्यक्रमात प्रश्न विचारणाऱ्यांची संख्या वाढली. या कार्यक्रमात काहींनी काँग्रेस विरोधी सूर लावल्याने काहीसा गोंधळ उडाला. आयोजकांना हवे असलेले प्रश्न आणि उत्तरे मिळत नसल्याने आयोजकांतही संभ्रम निर्माण झाला होता. काँग्रेसचे काही कार्यकर्ते आक्रमक झाले होते. काहींनी तर भाजपाने आपले कार्यकर्ते या कार्यक्रमात धाडल्याचा संशय बोलून दाखवला. मात्र आयोजकांनी संयमाने परिस्थिती हाताळल्याने अनर्थ टळला. तरीही भ्रष्टाचार प्रकरणाची पुरेपूर माहिती मिळू शकली नाही.
कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्याचा प्रयत्न
या
कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेसच्या जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यात प्राण
फुंकण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच नव्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची तयारी
पक्षाने केल्याचे दिसते. माजी मंत्री
राजेंद्र दर्डा, माजी खासदार
उत्तमसिंह पवार, आमदार सुभाष
झांबड या मंडळींना पुन्हा एकदा बळ देण्याचे काँग्रेसने ठरवले आहे, असे दिसून आले.
तर खासदारकीच्या स्पर्धेत असलेली काही नावे या कार्यक्रमात दिसू शकली नाहीत.
त्यामुळे काँग्रेसमध्ये गटबाजी पुन्हा उफाळून येण्याची चिन्हे आहेत. राजकारणाबाहेर
राहिलेल्या राजेंद्र दर्डा यांचा करिष्मा आजही कायम असल्याचे दिसते. आगमन होताच
उपस्थितांनी उभे राहून बाबूजी सोबत हस्तांदोलन करण्यासाठी एकच गर्दी केली होती.
बाबूजींची सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ अजूनही कायम असल्याचे दिसून आले. आमदार
सुभाष झांबड आणि राजेंद्र दर्डा यांचा यांचे कार्यक्रम स्थळी एकाच गाडीतून झालेले
आगमन आणि दोघांचेही वावरणे राजकारणाची दिशा ठरविणारे आहे.
गर्दी जमवण्यासाठीच अराजकीय लेबल
राफेल विमान खरेदी भ्रम आणि वास्तव या विषयावरील
व्याख्यान आयोजित केल्या नंतर आयोजक फ्रेंडस ऑफ डेमोक्रोसी आणि युथ ऑफ डेमोक्रोसी
या संस्थांनी व्याख्यान अराजकीय असल्याचे जाहीर केले होते. खरेतर हा कॉंग्रेसचाच
कार्यक्रम होता यात शंका नाही. तरीही अराजकीय या नावाखाली श्रोत्यांना आमंत्रित
करण्याची नामी शक्कल आयोजकांनी वापरली. त्यामुळे व्याख्यानाला चांगला प्रतिसाद
मिळाला. असे असले तरी याच कार्यक्रमात विरोधाचेही सूर उमटले. तीन ते चार चार तास
चालणारा कार्यक्रम दोन तासात आटोपता घ्यावा लागला, असे आता बोलले जात आहे.















