मुंबई : खरतर या देशात कायदा आहे की नाही, व्यक्तीस्वातंत्रय आहे की नाही? हा फेकला निरुपम काय बोलतो. शायना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडत आहे. तुम्ही खंडन करा, पण हे काय असा सवाल काँग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. देशांतील सर्वात खपाच हे पुस्तक आहे, जगात मागणी होत आहे. एक परदेशी महिला या देशाची नागरीक होते. तुम्ही असं वागता, तुमची मस्ती उतरवली जाणार, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना प्रवक्त्यांनी पुस्तक फाडल्यानंतर प्रतिक्रिया दिली. तर, नाना पटोले यांनीही संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते शीतल म्हात्रे, संजय निरुपम, शायना एनसी, आनंद दुबे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून आज काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचं बिलॉन्गिंगः अ जर्नी ऑफ लव्ह हे पुस्तक फाडून निषेध करण्यात आला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सोनिया गांधींनी अपमान केल्याचा आरोप करत शिंदेंच्या शिवसेनेकडून बिलॉन्गिंगः अ जर्नी ऑफ लव्ह पुस्तकावर बंदीची मागणी देखील केली. त्यानंतर, काँग्रेस नेत्यांनी संतप्त होत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
उद्धवजी यांना पुस्तक समजले असेल, आशय समजला आहे. मी सावरकर यांच्यावर काही बोलणार नाही, ते कोण होते हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे वेळ वाया घालवणार नाही. पण, तुम्ही आरएएस ची तळी उचलत आहात, असे म्हणत शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली. कालच बाळासाहेबांची स्मृती दिवस होता, आज बाळासाहेबांचा फोटो फाडला याचे भान नाही, हा निर्लजपणाचा कळस आहे, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी पुस्तक फाडणार्यांवर हल्लाबोल केला. कोर्टाने राहुल गांधी सावरकर खटल्यात नातवाची भूमिका काय आहे हे बघितले. निरुपम गोबर खाऊन आला आहे, तो चुकीच बोलतो, हे निर्बुद्ध आहेत असे म्हणत संजय निरुपम यांच्यावरही वडेट्टीवारांनी जोरदार टीका केली.
गुन्हा दाखल करा, नाना पटोलेंची मागणी
काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली. घाबरलेल्या अवस्थेत भाजप आणि त्यांचे मित्र आहेत, सोनिया गांधी यांच्या पुस्तकाची लोकप्रियता पाहता हे सगळे घाबरले आहेत. प्रसिद्धीसाठी हे सगळं केले आहे, या प्रवक्त्यांनी २ पाप केले. एका अशा महिलेचे पुस्तक त्यांनी फाडले, जिने पूर्ण आयुष्य लोकांसाठी घालवले आणि आपल्या पतीचा मृत्यू पहिला. त्याचबरोबर बाळासाहेबांचाही फोटो यांनी फाडला, हे दोन पाप त्यांनी केले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, तसेच देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.
खोक्यांची विचारधारा म्हणत काँग्रेसचा पलटवार
ज्या पक्षाची विचारधारा खोक्यापासून सुरू होते आणि खोक्यापर्यंत संपते त्यांच्या पुस्तक फाडण्याने काय फरक पडणार? बरं ज्यांनी पक्षाचे प्रवक्ते म्हणून पत्रकार परिषद घेतली ते दुसर्या पक्षातून आलेले आहेत. स्वतःच्या विचारांवर यांना ठाम राहता आले नाही, असे म्हणत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी पुस्तक फाडल्यावरुन शिवसेना नेत्यांवर टीका केली.
बरं पुस्तक फाडाल पण सत्य कसे फाडाल? सावरकरांबद्दल जे आक्षेपार्ह विधान या पुस्तकात आहे अशी भूमिका हे अघात ज्ञानी घेत आहेत त्याबाबत सावरकरांच्या नातवाने न्यायालयात स्वतः स्पष्टता दिली आहे. त्यामुळे आता सात्यकी सावरकरांना त्यांनी विचारावे. यांना ना इतिहासाचा अभ्यास ना विचार! हे पुस्तक देशात सगळ्यात लोकप्रिय झाले आहे. त्यामुळे, हे छाती बडवणे अरण्य रुदनच ठरत आहे. याद्वारे या ङ्गङ्घढङ्घङ्घ लोकांचा पुस्तकांशी संबंध तरी आला, असा खोचक टोला सावत यांनी लगावला. नाहीतरी पुस्तके फाडण्याचे काम अडाणी लोक करतात. शहाणे प्रतिवाद करतात. आमचे म्हणणे हेच की फाडायचे असेल तर विकत घेऊन फाडा, आम्ही अजून छापू, असेही सावंत यांनी म्हटले.
संजय राऊतांचं ट्विट, नगरसेवकांचे आंदोलन
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पुस्तक फाडल्यावरुन शिंदेंच्या शिवसेना पक्षातील नेत्यांवर दोनच शब्द प्रतिक्रिया दिली. बकवास लेकाचे... असे म्हणत संजय राऊत यांनी ट्विटवरुन शिंदेंच्या शिवसेना नेत्यांना टोला लगावला आहे. तर, शायना एनसी यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा अवमान झाल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मुंबई महापालिकेतील नगरसेवकही आक्रमक झाले आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेना नगरसेवकांनी आंदोलन करत शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली.