औरंगाबाद: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 23 एप्रिल रोजी होणार आहे. यात कोणत्या पक्षाचा कोणता उमेदवार आघाडी घेईल, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. सध्या मात्र पोस्टरबाजीत काँग्रेस पक्षाने आघाडी घेतल्याचे दिसते. लाज कशी वाटत नाही? परिवर्तन होणारच, महाआघाडी येणारच! अशा स्लोगनचे फलक रस्त्या-रस्त्यावर आणि चौका-चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने लावण्यात आले आहेत. पोस्टरबाजीत महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
शहरातील पैठणगेट,जालना रोड, क्रांतीचौक आदीसह इतर ठिकाणी अस्वच्छतेची ही परिस्थिती बदलूया.., चला बदल घडवूया..., तसेच मुलगी पळविण्याची भाषा करणार्या सत्ताधार्यांवर काँग्रेसने पोस्टरच्या माध्यमातून टीका केली आहे. आज तरी पोस्टरबाजीमध्ये काँग्रेस उमेदवार सुभाष झांबड हे आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक म्हटले की, जाहिरातबाजी आलीच. परंतु प्रत्यक्षात मतदारांचे मनपरिवर्तन करुन त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेणे हे अधिक महत्त्वाचे असते. यात सुभाष झांबड हे किती यशस्वी होतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. या निवडणुकीत कोणता
उमेदवार विजयी होईल हे वेळच ठरविल, असे बोलले जात आहे.
तरुणांची फसवणूक करणार्या सरकारला लाज कशी वाटत नाही ?
परिवर्तन होणारच महाआघाडी येणारच! असे घोषवाक्य पोस्टरमधून उद्गारून काँग्रेस पार्टीने पोस्टरमधून प्रचार केला आहे. त्यात ‘मुद्रा योजनेच्या नावाखाली रोजगाराची स्वप्ने दाखवून तरुणांची फसवणूक करणार्या सरकारला लाज कशी वाटत नाही? अशी टिकाही केली आहे. रोजगाराचे स्वप्न दाखविले परंतु ते पूर्ण झाले नाही, तसेच सरासरी कर्ज वाटप फक्त 45 हजारांचे, एवढ्या कमी पैशात उद्योग कसा सुरू करणार? इतकेच नव्हे तर जाचक अटीमुळे तरुणांना कर्ज मिळणे कठीण आहे. याशिवाय गरजू बेरोजगारांऐवजी सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांना कर्जवाटप केले. इतकेच नव्हे तर मुद्रा योजनेतील रोजगार निर्मितीचा अहवाल सरकारने दडविला. अशा अनेक प्रश्नांचा भडीमार पोस्टरमधून काँग्रेस पक्षाने केला आहे.