आयएसआयशी कनेक्शन, शहरातून एकाला अटक, भारतीय सैन्याची माहिती लीक करणार्‍यांना पुरवायचा पैसे !

Foto
छत्रपती संभाजीनगर: पाकिस्तानची कुप्रसिद्ध गुप्तचर संघटना आयएसआयच्या देशव्यापी हेरगिरी आणि आर्थिक नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी राजस्थान पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. भारतीय लष्कराची अत्यंत गोपनीय माहिती थेट पाकिस्तानपर्यंत पोहोचवणार्‍या कथित हेरगिरी रॅकेटला आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपाखाली राजस्थान सीआयडीच्या गुप्तचर विभागाने छत्रपती संभाजीनगरमधून रफीक चाँद शेख (वय ४१) या संशयिताला अटक केली आहे. ३० जून रोजी ही धडक कारवाई करण्यात आली असून, या अटकेमुळे देशाच्या संरक्षण क्षेत्राशी संबंधित गुप्त माहिती लीक करणार्‍या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

राजस्थान पोलिसांच्या तपासानुसार, जानेवारी २०२६ मध्ये अधिकृत गोपनीयता कायद्यांतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्याच्या सखोल तपासात अत्यंत धक्कादायक धागेदोरे पोलिसांच्या हाती आले. यापूर्वी जैसलमेरमधील झबरा राम आणि आसाममधील भारतीय हवाई दलाच्या डिब्रुगड तळावर कार्यरत असलेला एमटीएस कर्मचारी सुमित कुमार याला देशद्रोहाच्या आणि पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान, या दोन्ही आरोपींना हेरगिरीसाठी मिळणारा निधी छत्रपती संभाजीनगरच्या रफीक चाँद शेखमार्फत पोहोचवला जात असल्याचे बँक खात्यांच्या व्यवहारांवरून स्पष्ट झाले.

अशी उघड झाली रफीकची मोडस ऑपरेंडी
चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, रफीक चाँद शेख हा स्वतः थेट कोणतीही संवेदनशील माहिती गोळा करत नव्हता, तर तो  चा मुख्य फंडिंग एजंट म्हणून काम करत होता. तो गेल्या सुमारे चार वर्षांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील एका आयएसआय हँडलरच्या थेट संपर्कात होता. हँडलरच्या सूचनेनुसार रफीकने स्वतःच्या तसेच इतर लोकांच्या नावावर अनेक बँक खाती उघडली होती. या खात्यांमध्ये विविध माध्यमांतून आधी निधी जमा केला जायचा आणि त्यानंतर तो पैसा टप्प्याटप्प्याने भारतीय लष्कराची माहिती पाकिस्तानात पाठवणार्‍या आरोपींपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवला जायचा, असा तपास यंत्रणांचा दावा आहे.

देशविरोधी कारवाया करणार्‍यांना सोडणार नाही; पोलिसांचा इशारा
राजस्थान सीआयडीने ३० जून रोजी रफीकच्या मुसक्या आवळल्या असून, या आंतरराष्ट्रीय आर्थिक साखळीत आणखी कोणकोणत्या व्यक्ती सामील आहेत आणि हा पैसा कुठून येत होता, याचा सखोल तपास सुरू केला आहे. देशविरोधी कारवायांमध्ये आणि देशाच्या सुरक्षेशी खेळणार्‍या कोणालाही सोडले जाणार नाही, असा कडक इशारा राजस्थान पोलिसांनी दिला आहे.