शांतीगिरी महाराज योगी आदित्यनाथ यांच्या संपर्कात, 'धर्माच्या माध्यमातून राजकारणाचे शुद्धीकरण करणार'

Foto

वेरुळ – स्वामी शांतिगिरी महाराज लोकसभा निवडणूक लढवणार की नाही यावर स्पष्ट बोलत नसले तरी त्यांची पाऊले ही आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेच पडत आहेत. वेरुळ येथील स्वामी शांतिगिरी महाराज हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संपर्कात असून ते भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) तिकीटावर औरंगाबाद लोकसभा लढवण्याची तयार करत आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील तसेच बाहेर राज्यातील राजकारणी शांतिगिरी महाराजांच्या भेटीसाठी त्यांच्या मठात येत आहेत. याच महिन्यात वेरुळ येथे मोठा धर्म संस्कार सोहळा त्यांनी आयोजित केला आहे. या सोहळ्यासाठी त्यांच्या भक्त परिवारासोबतच सामान्य नागरिकांनाही जोडण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. धर्माच्या माध्यमातून राजकारणाचे शुद्धीकरण करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.

 

काय आहे धर्म संस्कार सोहळा

श्री संत जनार्दन स्वामी यांच्या २९ व्या पुण्यस्मृतीनिमित्त वेरुळ येथे १३ ते २० डिसेंबर दरम्यान धर्म संस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी दोन एकर परिसरात २५१ यज्ञ कुंड तयार करण्यात आले आहेत. सात दिवस चालणाऱ्या या धर्म संस्कार सोहळ्याचे यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यासह नाशिक, जळगाव आणि धुळे येथूनही स्वामी शांतिगिरी महाराजांचा भक्त संप्रयदाय येणार आहे. या धर्म संस्कार सोहळ्यामध्ये अनुष्ठान, यज्ञ, अखंड नंदादीप, श्रमदान, जपसाधना, अन्नदान, कुस्ती स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, माता-पित्यांना हवाई दर्शन, संत महंतांचे मार्गदर्शन असे भरगच्च कार्यक्रम आहेत.

 

राजकारणाचे शुद्धीकरण करणार

जय बाबाजी धर्मसंस्कार सोहळ्याच्यानिमित्ताने सांजवार्ता टीमशी बोलताना स्वामी शांतिगिरी महाराज म्हणाले, धर्म संस्कार सोहळ्यासाठी औरंगाबादसह इतरही जिल्ह्यातून लाखो भाविक येणार आहेत. हे कार्य धार्मिक आणि सामाजिक आहे. अनुष्ठाणच्या काळात, अर्थात धर्म संस्कार सोहळ्याचे सात दिवस लाखो भाविक मौनव्रत धारण करणार आहेत. भक्त स्वतः येथे श्रमदान करतात. अनुष्ठानच्या माध्यमातून सामान्य नागरिक त्यांच्या समस्यांपासून मुक्ती मिळवतात.


हे काम सामाजिक कसे आहे, हे सांगताना स्वामी म्हणाले,
अनुष्ठान म्हणजेच मौनव्रत धारण केल्याने मनावरचा संयम वाढतो. आजच्या धावपळीच्या जीवनात मनःशांती मिळावी म्हणून अनुष्ठान करणे  ही गरज झाली आहे. हे सात दिवसांचे अनुष्ठाण केल्यानंतर सामान्य नागरिक त्याच्या दुःखापासून मुक्ती मिळवतो त्यासोबतच या धार्मिक अनुष्ठाणाच्या माध्यमातून  लाखो लोक व्यसनमुक्त झाले आहे. या प्रमाणेच आता राजकारणाचे शुद्धीकरण होणे ही काळाची गरज बनली आहे, मतदार राजाने विचार करावा अशीही वेळ आली असल्याचे स्वामी शांतिगिरी महाराज  म्हणाले.

 

औरंगाबादसह नाशिक, धुळे, जळगावमध्ये उमेदवार उभे करणार 

स्वामी शांतिगिरी महाराज यांनी याआधी औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यांच्या उमेदवारीने खासदार खैरे यांना मतविभाजनाची भीती होती, मात्र स्वामींचा पराभव झाला होता. आगामी २०१९ लोकसभा लढवण्याचीही त्यांची तयारी सुरु आहे. मात्र यंदा ते नेमके कुठे उभे राहणार हे अजून निश्चित झाले नाही. त्यांच्या निकटवर्तियांच्या माहितीनुसार शांतिगिरी महाराज पुन्हा एकदा औरंगाबाद लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत. यावेळी ते अपक्ष न लढता भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर लढण्याची शक्यता आहे. यासाठी ते भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

 

राजकीय नेत्यांच्या भेटी-गाठी वाढल्या

बाबाजी निवडणूक लढवणार की नाही हे निश्चित नसले तरी मागील दोन महिन्यांपासून त्यांच्या भेटीसाठी येणाऱ्यांमध्ये राजकीय नेत्यांची संख्या सर्वाधिक आहे. भाजपचे गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे आमदार आणि मुख्यमंत्री फडणवीसांचे विश्वासू मानले जाणारे प्रशांत बंब, कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव आणि माजी खासदार उत्तमसिंग पवार यांनी नुकतीच बाबाजींची भेट घेतली आहे. बाबाजी लोकसभा लढवणार असल्याच्या चर्चेने अनेक दिग्गजांचे धाबे दणाणले आहे.     

२०१९ च् लोकसभा निवडणुकीमध्ये बाबाजी एकटेच उभे राहाणार नाही तर औरंगाबादसह नाशिक, धुळे, जळगाव या ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी ते उभे करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.  

राजकारणाचे शुद्धीकरण करून जनतेला न्याय देऊन विकास करण्यासाठी त्यांनी कंबर कसली असून जय बाबाजी भक्त परिवार सर्व  स्तरात मागील एक वर्षापासून जोमाने काम करत असल्याचे चित्र आहे.