छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेला सुरुवात होताच कॉपीमुक्त अभियान राबविण्यात आले असले तरी पहिल्याच दिवशी या अभियानाला धक्का बसल्याचे समोर आले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण तीन कॉपी प्रकरणे आढळून आली असून, त्यात एका परीक्षा केंद्रावर एक, तर जालना जिल्ह्यातील दोन परीक्षा केंद्रांवर प्रत्येकी एक अशी प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत.
परीक्षा शांततेत आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी मंडळाकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक केंद्रावर केंद्राध्यक्ष, पर्यवेक्षक, तसेच भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. काही ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणेद्वारेदेखील देखरेख ठेवण्यात येत आहे. तरीही उड्डाण पथकांच्या अचानक तपासणीत संबंधित विद्यार्थ्यांकडे अनधिकृत साहित्य आढळून आले. बोर्डाच्या माहितीनुसार, तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांकडे चिठ्ठ्या आढळून आल्या. संबंधित विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जप्त करून त्यांच्यावर मंडळाच्या नियमानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
उर्वरित पेपरना अधिक दक्षता घेणार
कॉपी प्रकरणे नोंदवून अहवाल मंडळाकडे पाठविण्यात आला आहे. राज्यभरात कॉपी रोखण्यासाठी शिक्षण विभागाने यंदा विशेष मोहीम हाती घेतली आहे. कॉपी करणार्यांवर कडक कारवाईचा इशारा आधीच देण्यात आला होता. तरीही पहिल्याच दिवशी कॉपीच्या घटना घडल्याने प्रशासनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
काटेकोर तपासणी
दरम्यान, उर्वरित पेपरदरम्यान अधिक दक्षता घेण्यात येणार असल्याचे मंडळाच्या अधिकार्यांनी सांगितले. परीक्षा केंद्रांवर अधिक काटेकोर तपासणी, विद्यार्थ्यांची झडती, तसेच भरारी पथकांच्या भेटी वाढविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कॉपीमुक्त परीक्षा हे प्रशासनाचे उद्दिष्ट असले तरी विद्यार्थ्यांनीही प्रामाणिकपणे परीक्षा द्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. पुढील दिवसांत अशा घटना टाळण्यासाठी अधिक कठोर पावले उचलली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.










