बुंगमधून पुन्हा ‘कोरोना बॉम्ब’

Foto
  • आरोग्य यंत्रणेची अक्षम्य चूक शहराला पडू शकते महागात
  •  क्‍वारन्टाईन करण्याऐवजी प्रवासी थेट घरी
  •  मनपा आणि जिल्हा रुग्णालयाचे परस्परांकडे बोट

  औरंगाबाद शहरात कोरोनाने टोक गाठलेले असताना आरोग्य यंत्रणा अत्यंत बेजबाबदारपणे वागत असल्याचे शुक्रवारी उघड झाले. शेजारच्या जिल्ह्यातूनही कुणी शहरात आले तर त्याच्या हातावर शिक्‍का मारून त्याला किमान होम क्‍वारन्टाईन केले जाते. मात्र औरंगाबाद शहरात कोरोनाचा शिरकाव हवाई मार्गाने झालेला असतानाही इंडिगो विमानातून आलेल्या 55 पैकी एकाही प्रवाशाला क्‍वारन्टाईन केले नसल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 8 मार्च रोजी कझाकिस्तान येथून आलेल्या प्राध्यापक महिलेच्या माध्यमातून शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला हे या ठिकाणी लक्षात घेण्यासारखे आहे.  
विमानाने आलेल्या प्रवाशाद्वारेच शहरात कोरोना आल्याचा इतिहास ताजा असताना काल विमानाने दिल्लीहून आलेल्या 53 प्रवाशांची ताप मोजणी करून सोडून देण्यात आले. पुणे मुंबई सारख्या शहरात  विमानतळावर क्‍वारन्टाईनचा शिक्का मारला जातो. शहर रेड झोन मध्ये असताना काल विमानाने दाखल झालेल्या प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी दिलीच कशी  असा सवाल आता उपस्थित होत आहे. 
मग जबाबदार कोण?
या संदर्भात सांजवार्ताच्या प्रतिनिधीने मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर तसेच जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही आमची जबाबदारी नाही असे सांगत परस्परांकडे बोट दाखवले. आरोग्य यंत्रणेची जबाबदारी नसेल तर मग जबाबदार कुणाची हा प्रश्‍न या निमित्ताने निर्माण झाला आहे.  
शहर रेड झोनमध्ये असून दररोज शंभरावर नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. काल इंडिगो चे विमान 53  प्रवाशांसह चिकलठाणा विमानतळावर दाखल झाले. विमानतळावर या प्रवाशांची ताप मोजणी करून नाव, पत्ते लिहून घेण्यात आले. त्यानंतर या प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. दरम्यान परदेश प्रवास करून आलेल्या व्यक्तीला शहरात आल्यावर क्‍वारन्टाईन सेंटरमध्ये पाठविले जाते असे असताना या प्रकरणात मात्र कोरोनासंदर्भात सर्व संकेत अक्षरशः पायदळी तुडविण्यात आले.
मनपाची जबाबदारी नाही : डॉ. पाडळकर
याबाबत मनपाच्या आरोग्य अधिकारी नीता पाडळकर यांना विचारले असता त्यांनी क्‍वारन्टाईन करण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालयाची असल्याचे सांगितले. विमानतळाचा भाग आमच्याकडे येत नाही. ती सर्व जबाबदारी मिनी घाटीची आहे, असे सांगून त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना विचारला असा सल्ला सांजवार्ता प्रतिनिधीला दिला.
जबाबदारी मनपाचीच : डॉ. कुलकर्णी
 दरम्यान याबाबत जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर प्रदीप कुलकर्णी यांना विचारले असता त्यांनी प्रवाशांना क्‍वारन्टाईन करण्याची जबाबदारी आमची नाही असे सांगून मनपाकडे बोट दाखविले. आमच्या पथकाने प्रवाशांची तपासणी केली नाव पत्ते लिहून घेतले. मात्र क्‍वारन्टाईन करण्याची जबाबदारी मनपाची आहे असे ते म्हणाले.