कोरोनाचे थैमान; प्रशासन हैराण

Foto

*लॉकडाऊन संदर्भात फेरविचार होणार असल्याच्या चर्चेला उधाण

* गेल्या 10 दिवसांत 856 रुग्ण वाढले तर 48 मृत्युमुखी

लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यात आल्यापासून कोरोनाचे थैमान वाढत चालले आहे. त्यातच गर्दीवरही कोणत्याही प्रकारचा अंकुश लावण्यात यश येत नसल्यामुळे लॉकडाऊन संदर्भात फेरविचार होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. 1 जून ते 10 जून या 10 दिवसांत रुग्णांच्या संख्येत 856 ची भर पडली असून मृत्यूचा आकडाही 48 ने वाढला आहे. त्यामुळे आज कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,264 तर बळींची संख्या 118 पर्यंत पोहचली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत सातत्याने मोठी भर पडत आहे. 6 जूनला एकाच दिवशी 90 रुग्णांची नोंद झाली होती. आज 114 रुग्ण वाढले आहेत. आतापर्यंतचा हा उच्चांक आहे.
1 जूनपासून निर्बंध शिथिल झाले. 8 जूनपासून बाजारपेठाही उघडल्या. त्यामुळे आता जनजीवन सुरळीत होईल, व्यवसाय, धंदे पुन्हा एकदा नव्या जोमाने झेप घेतील अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात येत होती. औरंगाबादचे नागरीक सुशिक्षित असल्याने कोरोनाचे संकट लक्षात घेऊन त्यांच्याकडून योग्य ती काळजी घेतली जाईल, असे त्यामागे गृहीतक होते. मात्र प्रशासनाच्या या अपेक्षा पहिल्या आठवड्यातच धुळीला मिळाल्या. सुट मिळताच नागरिकांनी प्रचंड उत्साहात मुक्‍ततेचा जणू उत्सवच साजरा केला. ‘गर्दी जेथे, कोरोना तेथे’ असे सूत्र असल्याने गर्दी बरोबरच कोरोना झपाट्याने वाढू लागला आणि प्रशासनाची काळजी वाढली. अनेक ठिकाणी नागरिक कोणत्याही प्रकारचे निर्बंध पाळत नसल्याचे प्रशासनाला आढळून आले आहे. कोरोनाला गर्दीत चिरडून मारण्याचे औरंगाबादकरांनी जणू काही ठरवल्यासारखे वागताना दिसत आहेत. अगदी आजही रस्त्यावर, किराणा दुकानात, भाजी मार्केटमध्ये गर्दीच गर्दी होती. ज्यावेळेस रुग्णसंख्या अत्यंत कमी होती त्यावेळी निर्बंध कडक होते. आज रुग्णसंख्या मारुतीच्या शेवटीसारखी वाढतच चाललेली असताना कोणतेही निर्बंध नाही. हा उरफटा न्याय शहराच्या अंगाशी येईल की काय अशी भीती व्यक्‍त होत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून रोजच्या रोज बैठकांवर बैठका सुरू आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येला आळा कसा घालता येईल, याबाबतची चर्चा होते आहे. या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनच्या निर्बंधात काही उलटफेर होण्याची शक्यता वरिष्ठ पातळीवरून व्यक्‍त होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून या संदर्भात शहरभर मोठी चर्चा सुरू आहे. गर्दी आणि कोरोना रुग्णांची संख्या आवाक्यात आली नाही तर प्रशासन लॉकडाऊनच्या संदर्भात फेरविचार करू शकते, अशा चर्चेला सर्वत्र उधाण आले आहे.
आज दोघांचा मृत्यू
घाटीत आज दोन रुग्णांचा  मृत्यू झाला. त्यात भावसिंगपुरा येथील 79 वर्षीय महिला आणि बिस्मिल्ला कॉलनी येथील 55 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृत्यूची संख्या 118 झाली आहे.
4 दिवसात 328 तर दहा दिवसांत 856 रुग्णांची वाढ
1 तारखेपासून लॉकडाऊनमध्ये शितीलता केल्याने कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. 1 तारखेपासून आज 10 तारखेच्या दुपारपर्यंत 856 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर सहा तारखेनंतर आज दुपारपर्यंत 328 रुग्णांची वाढ झाल्याने चिंता आणखी वाढली आहे. याशिवाय कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. 1 तारखेपासून सहा तारखेपर्यंत 26 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर यात 7 तारखेपासून आजपर्यंत चारच दिवसात 23 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढली आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker