तिसऱ्या अपत्याची माहिती लपवणे नगरसेवकाला भोवले

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मतीन पटेल यांच्यानंतर आता एमआयएमचा आणखी एक नगरसेवक पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून, महानगरपालिका निवडणूक लढवण्यासाठी नगरसेवक मेहराज खान याने आपल्या तिसऱ्या अपत्याची माहिती लपवल्याचा प्रकार उघड झाला आहे. विशेष म्हणजे मालेगाव येथील इस्लाम पार्टीचे नेते रफत यार खान यांच्यावरील हल्ल्याच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी या प्रकरणाचे धागेदोरे शोधून काढले.
नगरसेवक मेहराज खान जलील खान, मुख्याध्यापक इलियास कदीर सिद्दीकी या दोघांसह निलोफर मेहराज खान, मिनाज खान जलील खान, इकरा मिनाज खान,
सजू उस्ताद आणि विधिसंघर्षग्रस्त बालकाचा आरोपींमध्ये समावेश आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मनीषा हिवराळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. २७मार्च रोजी इस्लाम पार्टीचे नेते रफत यार खान यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यात मेहराजचा भाऊ मिनाज खानसह ११ आरोपींचा समावेश होता. यात एक विधिसंघर्षग्रस्त बालकही होता. पोलीस तपासात मेहराज खानने तिसरे अपत्य लपवल्याचे उघड होताच १२ मे रोजी सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी मेहराज खान आणि मुख्याध्यापक इलियास सिद्दीकी यांना अटक करण्यात आली.
शपथपत्रात खोटी माहिती
नगरसेवक मेहराज खान यांनी मनपा निवडणूक अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात दोन अपत्य असल्याचे नमूद केले होते. तिसऱ्या अपत्याचे नाव नमूद केले नव्हते. मुख्याध्यापक इलियास सिद्दीकीच्या लेखी जबाबात त्या विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या वडिलांचे नाव बदलून (मेहराज ऐवजी मिनाज) आरोपी सज्जू उस्ताद याने त्याचे जन्मप्रमाणपत्र पाठवल्याचे समोर आले. त्या प्रमाणपत्राची खात्री केली असता ते बनावट असल्याचे उघड झाले. त्यानंतर हा घोटाळा उघड झाला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions