छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेने नियुक्त केलेल्या गुजरातच्या कंपनीमार्फत शहराच्या विविध भागांत वाहने उभी करण्यासाठी शेड तयार केले जात आहेत. या शेडला नवनिर्वाचित नगरसेवकांकडून विरोध होत आहे. त्यामुळे दोन ठिकाणी शेडचे काम थांबले आहे. एका ठिकाणी महापालिकेच्या कंत्राटदारानेच विरोध केला.
महापालिकेने शहरातील कचरा संकलन आणि वाहतुकीचे कंत्राट रेड्डी कंपनीला दिले होते. कंपनीचा सात वर्षांचा करार संपल्याने नव्याने निविदा प्रक्रिया राबवून महापालिकेने वेस्टर्न इमॅजिनरी या कंपनीची निवड केली. कंपनीने घंटागाड्या तयार करणे सुरू केले. एका घंटागाडीचे प्रात्यक्षिकही सोमवारी (दि.२) महापालिका मुख्यालयात दाखविण्यात आले. आयुक्त जी. श्रीकांत यांनी नव्या घंटागाडीची पाहणी केली. दरम्यान, कंपनीला सलीम अली सरोवर, हसूर्ल, उल्कानगरी, जकात नाका, पडेगाव आदी भागांत घंटागाड्या उभ्या करण्यासाठी जागा देण्यात आली. त्यानुसार शेड उभारणी सुरू करण्यात आली. पण, या कामाला विरोध झाल्याने काम थांबविण्यात आले. पडेगाव येथे स्लाटर हाऊस चालविणार्या कंपनीने कचर्याच्या गाड्यांच्या शेडला विरोध केला.
नवीन घंटागाड्यांना जीपीआरएस बंधनकारक
नव्या कंपनीच्या नव्या घंटागाड्या चारही बाजूने बंद आहेत. त्यामुळे जमा झालेला कचरा सीलबंद पद्धतीनेच प्रक्रिया केंद्रावर नेला जाईल. प्रत्येक गाडीवर प्रभागाचा नंबर, कर्मचार्याचा संपर्क नंबर असेल; तसेच प्रत्येक घरावर क्यूआर कोड, घंटागाडीला जीपीआरएस लावणे बंधनकारक राहणार आहे. १,२०० घरांमागे किमान एक घंटागाडी राहणार आहे.
ठरवून दिलेल्या पॉइंटवर घंटागाडी पोचल्यास ग्रीन सिग्नल दिसेल न पोचल्यास रेड सिग्नल दिसेल. घंटागाडी चालकाने रूट बदलल्यासही कंट्रोल रूममध्ये सूचना मिळेल, रूट का बदलला, याचे कारण
द्यावे लागेल. नियमाचे उल्लंघन केल्यास कंपनीला दंड भरावा लागणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.












