ट्रकच्या धडकेत दाम्पत्यासह नात जखमी

Foto
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) : भरधाव ट्रकने दुचाकीला मागून धडक दिल्याने दाम्पत्यासह त्यांची चारवर्षीय नात जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी पावणेदहाच्या सुमारास पंढरपूरच्या कामगार चौकात घडली. पांडुरंग जनार्दन परदेशी (वय ५३, रा. भिम टाकळी ता. राहुरी) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, त्यांच्यावर सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ते मजुरी करतात. सोमवारी ते व त्यांची पत्नी वंदना (वय ४८) व ४ वर्षीय नात दुचाकीने (एमएच १७. एएम ५२३७) पदमपुरा येथून गावी भिम टाकळी येथे जात होते.
त्यांच्या मोटारसायकलला पंढरपूरच्या कामगार चौकात मागून येणार्‍या ट्रकने (एमएच १७, बीवाय ५३०३) भरधाव धडक दिली. यात तिघेही जखमी होऊन रस्त्यावर पडले. लोक जमलेले पाहून ट्रकचालक पळून गेला. पांडुरंग परदेशी यांच्या मुलाला कॉल करून बोलावल्यानंतर त्यांनी पांडुरंग आणि वंदना यांना सिग्मा हॉस्पिटलमध्ये तर नातीस अमृत बाल रुग्णालयात दाखल केले. ट्रकचालकाविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.