शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या तिघांना न्यायालयाचा दणका

Foto
पोलीस कर्मचाऱ्यावर दगडफेक केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

गंगापूर, (प्रतिनिधी) : गंगापूर: शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून पोलीस कर्मचाऱ्याला दगड फेकून मारल्याप्रकरणी दाखल सत्र खटल्यात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, गंगापूर यांनी २६ नोव्हेंबर २०२६ रोजी महत्त्वपूर्ण निकाल दिला. या प्रकरणात आरोपींना भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार शिक्षा व दंड सुनावण्यात आला. या प्रकरणातील सविस्तर हकीकत अशी की, सिरजगाव येथे शासकीय स्तरावर रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू होते. यावेळी मंडळ अधिकारी, तलाठी व पोलीस कर्मचारी शासकीय कर्तव्य बजावत असताना आरोपींनी जेसीबी वाहनासमोर येऊन दमदाटी व हुज्जतबाजी केली. 

तसेच रस्ता मोकळा करण्याच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तलाठी व मंडळ अधिकारी यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असतानाही आरोपी राहुल काकडे याने पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे यांच्यावर दगड फेकून मारला. यामध्ये त्यांच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ए.सी. कुंभार यांनी केला.

सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड. कृष्णा एस. गंडे यांनी बाजू मांडली जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, गंगापूर येथील मा. न्यायाधीश राहुल आण्णासाहेब शिंदे यांच्या न्यायालयात सत्र खटला क्रमांक ३५६ / २०२५ ची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अॅड. कृष्णा एस. गंडे यांनी बाजू मांडली. या प्रकरणात फिर्यादी म्हणून तलाठी आफरीन अफजल पटेल यांनी तक्रार दिली होती. गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास व न्यायालयीन कामकाज पार पडले. न्यायालयीन पैरवीचे काम पोलीस अंमलदार ए. के. शेख यांनी पाहिले.

-- शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार -- 
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना अडथळा निर्माण करणे किंवा त्यांच्यावर हल्ला करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. गंगापूर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय कामकाज करताना कोणी नागरिक अडथळा निर्माण करत असेल, दमदाटी करत असेल किंवा शासकीय कामात हस्तक्षेप करत असेल, तर त्यांनी तात्काळ गंगापूर पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करावी. गंगापूर पोलीस प्रशासन नेहमीच सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, त्यांच्या सुरक्षिततेला आणि शासकीय कामकाजाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.
- सलीम चाऊस,
पोलीस निरीक्षक, गंगापूर पोलीस ठाणे