जमीन व्यवहार प्रकरणात आरोपींना न्यायालयाचा दिलासा

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : सातारा परिसरातील कथित ६ कोटी रुपयांच्या जमीन व्यवहार प्रकरणात न्यायालयाने आरोपींना दिलासा दिला आहे. अटकपूर्व जामीन मंजूर करताना न्यायालयाने हा वाद मुळात दिवाणी स्वरूपाचा असल्याचे निरीक्षण नोंदवले. या प्रकरणात तक्रारदार अशोक चंदमल लोढा यांनी जमीन व्यवहारात फसवणूक झाल्याचा आरोप करत सातारा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता. मात्र व्यवहारानंतर राजू खेडकर यांनी शेजारील जमिनीवर दावा केल्यामुळे सीमारेषा आणि अतिक्रमणासंदर्भात वाद निर्माण झाल्याचे बचाव पक्षाने न्यायालयात केला. 
दरम्यान, या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यापूर्वीच इतर आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. त्यानंतर खालच्या न्यायालयानेही प्रकरणातील परिस्थितीचा विचार करून संबंधित आरोपींना दिलासा दिला. न्यायालयाने नमूद केले की, जमीन व्यवहारासंदर्भातील करार, कागदपत्रे आणि नोंदी झालेल्या असून वाद असल्यास संबंधितांनी दिवाणी न्यायालयात दाद मागणे अपेक्षित होते. अशा स्वरूपाच्या प्रकरणात थेट फौजदारी गुन्हा दाखल करणे योग्य नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणात आरोपींच्यावतीने अ‍ॅड. प्रशांत नागरगोजे यांनी बाजू मांडली. जमीन व्यवहार हा दिवाणी स्वरूपाचा असून तक्रारदाराने चुकीच्या पद्धतीने फौजदारी गुन्हा दाखल केला असल्याचा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला.