औरंगाबाद: कन्नड तालुक्यातील शिवना नदीच्या पात्रात गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री कारवाई करून दोन ट्रॅक्टर व एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल मधुकर भिंगारे (वय २५ वर्षे) राहणार जैतापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, येथील गुन्हे शाखेचे एक पथक कन्नड तालुक्यात अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यादरम्यान खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार जयतापुर शिवारातील शिवना नदी पात्रातून अवैध वाळूचा उपसा सुरू असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक शिवना नदी पात्रात गेले असता तेथे ट्रॅक्टर क्रमांक (एमएच २० ईई ४९६६) व डीआय ७४५ मध्ये वाळू भरताना मिळून आले. चालकाला पोलिसांनी कागदपत्र विषयी विचारपूस केली असता अवैध प्रकारे वाळू भरणा सुरू असल्याचे समोर आले. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदरील कारवाईत पोलिसांनी सहा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या धडाकेबाज गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील, अपर पोलीस अधीक्षक गणेश गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.