अनधिकृत बॅनरबाजांवर गुन्हे नोंदवू : पोलिस आयुक्त

Foto
छत्रपती संभाजीनगर (सांजवार्ता ब्युरो) : अनधिकृत बॅनरबाजीमुळे नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होत असेल तर महापालिकेने तक्रार दिल्यास संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल केले जातील, असे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी मंगळवारी (दि. २४) सांगितले. 
दरम्यान, रस्त्यालगत इमारतींवरील महाकाय होर्डिंगचीही एकदा पडताळणी करणे गरजेचे आहे. शहरातील होर्डिंग, बॅनर हे अधिकृत आहेत किंवा नाही हे महापालिका ठरविते. यात पोलिसांचा संबंध नाही. तसेच बॅनरवर असलेल्या छायाचित्रातील व्यक्तींवर गुन्हा दाखल होत नाही. ज्या व्यक्तीने ते बॅनर लावले असेल त्याच्यावरच गुन्हा दाखल होईल, असे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या कारवाईला पोलिसांचे पूर्णपणे सहकार्य असेल, असेही पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. शहर व परिसरातील विविध भागांत महावितरणच्या मालकीचे विजेचे खांब, रोहित्र (ट्रान्सफॉर्मर), वितरण पेट्या, विद्युत वाहिन्या व इतर विद्युत संरचनांवर अनधिकृतरीत्या बॅनर, पोस्टर, होर्डिंग लावणे तसेच केबल टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होत असल्याचे महावितरणने म्हटले आहे.