वीज पुरवठ्याअभावी पिके करपू लागली; वाळूज येथे २२ मे रोजी बोंबाबोंब, ठिय्या आंदोलन

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) :: तालुक्यातील तुर्काबाद व शेंदूरवादा सब स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अनेक गावांतील शेतकऱ्यांनी टेंभापुरी मध्यम प्रकल्पावरून लाखो रुपये खर्च करून शेतीसाठी पाईपलाईन टाकल्या आहेत. 

ऊस, भाजीपाला व इतर नगदी पिकांसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. मात्र महावितरणकडून वेळेत व सुरळीत वीजपुरवठा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिके अक्षरशः करपत असून परिसरात अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या सततचे लोडशेडिंग, कमी दाबाचा वीजपुरवठा, वारंवार होणारे फॉल्ट व अपुरा वीजपुरवठा यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. 

लाखो रुपये खर्च करून उभारलेली पाईपलाईन व्यवस्था व शेतीतील गुंतवणूक धोक्यात आली असून अनेक शेतकऱ्यांचा ऊस व इतर पिके पाण्याअभावी वाळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महावितरण प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कृती समितीच्या वतीने महावितरण प्रशासनाकडे तातडीने विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

शेतीपंपासाठी नियमित व पुरेशा दाबाने वीजपुरवठा करावा, वारंवार होणारे फॉल्ट व ट्रिपिंग बंद करून तांत्रिक दुरुस्ती करावी, जळालेले डीपी, खराब तारा व विद्युत यंत्रणा तातडीने बदलाव्यात, तसेच शेतकऱ्यांना किमान सलग १६ तास गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.

तसेच पाण्याअभावी करपलेल्या पिकांचे पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्यास दिनांक २२ मे २० २६ रोजी सकाळी ११ वाजता महावितरण उप अभियंता कार्यालय, वाळूज येथे शेतकऱ्यांच्या वतीने बोंबाबोंब ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी कृती समितीचे राहुल ढोले यांनी दिली आहे. 

आंदोलनादरम्यान निर्माण होणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी महावितरण प्रशासन जबाबदार राहील, असाइशाराही शेतकरी कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.