अयोध्या : अयोध्येतील भव्य राम मंदिरात प्रभू रामललाच्या दर्शनासाठी येणार्या कोट्यवधी भाविकांनी दानपात्रामध्ये अर्पण केलेल्या रकमेत मोठ्या प्रमाणावर हेरफेर आणि अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दानपेटीतील पैशांची मोजणी करणार्या काही कर्मचार्यांनीच हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, गुपचूप लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याच्या पाळतीमुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला असून राजकीय वर्तुळातही यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने राम मंदिरासह संपूर्ण दर्शन मार्गावर सुमारे ४ डझन दानपात्रे ठेवली आहेत. या पैशांची रोज मोजणी करण्यासाठी ट्रस्टने स्टेट बँक ऑफ इंडियाला अधिकृत केले आहे. एसबीआयने या कामासाठी एका खाजगी एजन्सीची नियुक्ती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पैशांच्या मोजणीत हेरफेर होत असल्याची शंका आल्याने तिथे एक छुप्या पद्धतीचा सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात आला होता. शुक्रवार, ५ जून रोजी या कॅमेर्याच्या फुटेजमधून कर्मचार्यांची चोरी पकडली गेली.
बँक खात्यातून पैसे रिकव्हर
पोलिसांनी संशयास्पद कर्मचारी अविनाश शुक्ल याच्यासह ४ ते ५ जणांच्या टोळीची कसून चौकशी केली. या चौकशीत अविनाशने चोरीची रक्कम स्वतःच्या बँक खात्यात जमा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलीस पथकाने त्याला बँकेत नेऊन त्याच्या खात्यातील ५ लाख रुपये पुन्हा ट्रस्टच्या खात्यात जमा करून घेतले आहेत. परंतू, यापूर्वी रोज जे पैसे चोरले त्याची काहीच मोजदाद नाहीय. ही रक्कम कोट्यवधीत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अखिलेश यादव यांचा थेट सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करण्याचा आग्रह!
हा प्रकार समोर येताच समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी (ट्विटर) वर पोस्ट करत केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अखिलेश यादव म्हणाले, संपूर्ण जगातील प्रभू रामाच्या भक्तांसाठी ही अत्यंत संवेदनशील आणि धक्कादायक बातमी आहे. राम मंदिरातील चढाव्याची कोट्यवधींची रक्कम गायब झाल्याचे समोर आले आहे. मंदिर ट्रस्टसाठी ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून यावर कोणीही स्पष्टीकरण देण्यास पुढे येत नाहीये. या प्रकरणी सरकारने बाळगलेली गप्पता संशयास्पद असून, सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून याची दखल घ्यावी.
जबाबदार अधिकार्यांची चुप्पी अन् ट्रस्टचे स्पष्टीकरण
या प्रकरणावरून गेल्या तीन दिवसांपासून अयोध्येत कमालीचा तणाव आणि चर्चांचे पीक आले आहे. मात्र, अधिकृत पातळीवर सुरुवातीला सर्वांनीच मौन बाळगले होते. मंदिराचे व्यवस्थापक गोपाल राव आणि सुरक्षा प्रमुख बलरामाचारी दुबे यांनी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे सांगत या केवळ अफवा असल्याचे म्हटले होते.
आंतरिक ऑडिट सुरू आहे - चंपत राय
वाढता वाद पाहता श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी अधिकृत पत्रक जारी करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले, श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे वेळोवेळी अंतर्गत ऑडिट केले जाते. या कामात ट्रस्ट आणि स्टेट बँकेचे प्रतिनिधी सामील असतात. हे ऑडिट अनेक दिवस चालते आणि सध्या तेच काम सुरू आहे. आतापर्यंत कोणतीही मोठी किंवा उल्लेखनीय बाब समोर आलेली नाही. मात्र, दुसरीकडे एका कर्मचार्याकडून ५ लाख रुपये रिकव्हर झाल्यामुळे ट्रस्टच्या अंतर्गत सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.