बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी अन् चोरट्यांची चांदी !

Foto
एकाच दिवशी ६ मंगळसूत्रांसह ४० मोबाईल चोरीला
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : सोमवारी गणेशोत्सवानिमित्त बाजारपेठांमध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी उच्छाद मांडत जवाहरनगर आणि मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात प्रत्येकी ३ अशा एकूण ६ मंगळसूत्र चोरीच्या घटना समोर आल्या. शहरातून तब्बल ४० हून अधिक मोबाईल लांबविल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
शहराच्या प्रमुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांची तोबा गर्दी पाहायला मिळत आहे. विशेषतः सेव्हनहिल उड्डाणपूल ते गजानन महाराज मंदिर रस्ता, मुकुंदवाडी, गुलमंडी, औरंगपुरा, टीव्ही सेंटर, साताऱ्यातील गोदावरी टी पॉईंट
उड्डाणपूल आणि चिकलठाणा परिसरात खरेदीसाठी प्रचंड गर्दी असते. खरेदीच्या नादात ग्राहकांचे लक्ष विचलित झाल्याचे पाहून चोरटे हातसफाई करत आहेत. या गर्दीत खिसाकापू आणि मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. मागील दोन दिवसांत खरेदीदारांची गर्दी वाढताच चोरटे सक्रिय झाले. त्यांनी गर्दीत घुसून अनेकांचे मोबाइल लंपास केले. सिटी चौक, क्रांती चौक, जवाहरनगर, पुंडलिकनगर, मुकुंदवाडी आदी पोलीस ठाण्यात तक्रारदारांची गर्दी झाली होती.
जाधववाडीतून चोरटा पकडला
जाधववाडी मोंढा येथे खरेदीसाठी आलेले संतोष दहीहंडे (रा. चिकलठाणा) यांचे दोन
मोबाइल चोरट्यांनी लंपास केले. रविवारी सकाळी ही घटना घडली. तर, दुसऱ्या घटनेत सिडको बसस्थानक परिसरातून अरबाज आत्तार यांचा महागडा मोबाइल चोरीला गेला. ते बीडला जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना गर्दीत त्यांचा मोबाइल लांबवण्यात आला. तसेच सिटी चौक पोलिसांनी मोबाइल चोराला पकडले असून त्याला न्यायालयाने ३ दिवसांची कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी दिली.
या भागातून मारला डल्ला
गुलमंडी, शहागंज भागातून १५, औरंगपुरा, पैठण गेट पसिररातून ८ ते १० तर मुकुंदवाडी ३, टीव्ही सेंटर ३ मोबाईल चोरट्यांनी लंपास केले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions