काळा पैसा पांढरा करणार्‍याला सायबर पोलिसांच्या बेड्या

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : काळा पैसा पांढरा करण्यासाठी चक्क विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांच्या नावावर बँक खात्याचा वापर करणार्‍या भामट्याला सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. भरतलाल तलरेजा (२२, रा. कृष्णा रेसिडेन्सी मित्रनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने १७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी दिली.
देशभरातील सायबर गुन्हेगारांच्या मोठ्या टोळीचा सक्रिय सदस्य असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याच्या संशयास्पद कारनाम्यामुळे यापूर्वी एटीएसनेही दहशतवादविरोधी पथक त्याला दोन वेळा उचलले होते. एक गुन्हाही दाखल आहे. फिर्यादी निखिल प्रकाश साळवे (रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्या खात्याचा गैरवापर करून १ जुलै ते सप्टेंबर २०२५ या काळात १२ लाख ५५ हजार रुपये होते. त्यांनी याप्रकरणी सायबर ठाण्यात दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. ११ मार्च रोजी तलरेजा याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपी तलरेजा पैशाचे आमिष दाखवून विद्यार्थी व बेरोजगारांच्या नावाने बँक खाती उघडायचा. त्या बँक खात्यांचे पासबुक, एटीएम कार्ड, सिमकार्ड, स्वतःकडे ठेवायचा. फसवणुकीद्वारे उकळलेली रक्कम या खात्यांवर जमा व्हायची आणि आरोपी एटीएम किवा चेकद्वारे ही रोख रक्कम तात्काळ काढून घ्यायचा, पोलिसांनी त्याच्याकडून अशा प्रकारच्या ५ तरुणांच्या किट जप्त केल्या. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त (गुन्हे) रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनात सायबर ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव, सहाय्यक निरीक्षक कविर देशमुख, उपनिरीक्षक गणेश गिरी अंमलदार योगेश तळवदे, सुशांत शेळके, नितीन देशमुख, अमोल सोनटक्के, धनंजय सानप, गोकुळ कुत्तरवाडे आदींनी केली.