छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहरातील गॅस एजन्सींवरील घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा वितरक कंपन्यांकडून जवळपास निम्म्याने घटवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परिणामी गॅस एजन्सींज ऑक्सिजनवर आल्या आहेत.
बुकिंगनंतरही सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. वेटिंग यादी १५ दिवसांवर गेल्याचे एजन्सींचालकांनी सांगितले. गॅस मिळत नसल्याने घाबरलेल्या ग्राहकांची विविध गॅस वितरक एजेन्सीवर गर्दी होत आहे. यामुळे वाद होण्याच्या भीतीने एजन्सींचालकांनी पोलिस बंदोबस्त मागितला आहे. त्यातच आता मागील दोन दिवसांपासून कंपन्यांकडून वितरक एजन्सींवर होणारा घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा जवळपास निम्याने घटवला आहे.
टंचाईच्या झळा तीव्र
नवीन नियमांमुळे बुकिंगनंतर पुरवठ्याचा अवधी वाढतच चालल्याने गॅस टंचाईचे चटके थेट स्वयंपाक घरापर्यंत पोहोचले आहेत. बुकिंग केलेल्यांना प्रतीक्षा यादी १० दिवसांवरून कुठे १२ दिवस, तर कुठे १५ दिवसांपर्यंत गेल्याने टंचाईच्या झळा अधिकच तीव्र होण्याची चिन्हे आहेत.










