राज्यात आज दहीहंडीची धूम..! शहरात सहा ते सात थरांपर्यत दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा सज्ज

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) :  राज्यभरात आज दहीहंडी  उत्सव अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. यंदा विविध दहीहंडी मंडळांकडून गोविंदा पथकांसाठी लाखो रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली असून, अनेक ठिकाणी मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. ठाण्यातील स्वामी प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सव यंदा विशेष चर्चेत आहे. या महोत्सवात तब्बल ७१ लाख रुपयांची बक्षिसे वितरित केली जाणार आहेत. गोविंदा पथकांचा मोठा सहभाग आणि सेलिब्रिटी हंडी म्हणून मिळालेली ओळख यामुळे या उत्सवाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे. 

ठाण्यातील टेंभी नाका दहीहंडी देखील मानाची मानली जाते. मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी स्वतंत्र हंड्या ठेवण्यात आल्या असून, विजेत्या पथकांना प्रत्येकी १ लाख ५१ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. महिलांच्या गोविंदा पथकासाठीही १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

९ व्या थरावरुन गोविंदा कोसळला
मुंबईतील घाटकोपमध्ये मनसेच्या गणेश चुक्कल यांच्या दहीहंडीमध्ये अखिल मालपा डोंगरी अंधेरी पूर्वचा गोविंदा पहिले नऊ थर उभाले. यंदा मुंबईमध्ये ९ थर लावणारे अखिल मालपा डोंगरी पथक पहिले ठरले. ९ थर लावण्यानंतर खाली उतरताना ९ व्या थरावरील गोविंदा कोसळला. यादरम्यानचा थरारक क्षण समोर आला आहे.

दरम्यान, जन्माष्टमीच्या उत्साहानंतर आज गोपाळकालानिमित्त शहरात दहीहंडीचा थरार रंगणार आहे. शहरातील विविध भागांत दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, सायंकाळी ढोल-ताशांचा गजर, गोविंदा पथकांचा जल्लोष आणि थरावर थर रचत दहीहंडी फोडण्याचा थरार पाहायला मिळणार आहे. या सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी अनेक सेलीब्रिटीं निमंत्रित करण्यात आले आहे.

गोपाळकालाच्या निमित्ताने यंदाच्या दहीहंडीमध्ये थरांची उंची आणि गोविंदांचा उत्साह चर्चेचा विषय ठरणार आहे. शहरातीलकॅनॉट प्लेस, निराला बाजार, टीव्ही सेंटर, सिडको बजरंग चौक, पुंडलिकनगर रोड, कैलासनगर, महात्मा फुले चौक, उल्कानगरी हनुमान मंदिर रोड यासह विविध ठिकाणी दहीहंडी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अनेक मंडळांनी गेल्या काही दिवसांपासून या सोहळ्याची तयारी सुरू केली असून, गोविंदा पथक सज्ज झाले आहे. कैलासनगर येथे नमो दहीहंडी महोत्सव्याच्या वतीने सहा थरापर्यत दहीहंडी महोत्सव घेण्यात येणार आहे. त्यासाठी ३२ मंडळानी दहीहंडीला सलामी देण्यासाठी नोंदणी केली असल्याची माहिती नमो दहीहंडी महोत्सव कैलासनगरचे महोत्सव अध्यक्ष निखिल महाले यांनी दिली. तसेच कॅनॉट परिसरात यंदा विशेष आकर्षण ठरणारी महिलांसाठी दहीहंडी. यात खासकरून महिलांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात येणार आहे. त्यासाठी आयोजकांनी खास नियोजन केले आहे.