छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मौजे गणोरी (ता. फुलंब्री) येथील संस्कार इंग्लिश स्कूल विनापरवाना १० वर्षापासून चालू असून डायस नंबर नसताना गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांच्या मेहरबानीमुळे बोगस शाळा चालू आहेत. या शाळेवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दलित पँथरच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर कालपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे.
याप्रकरणी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण या अशा शाळा चालकांना नजरेआड करत आहेत. मुलांना या शाळेत कोणत्याही सुविधा नाही. याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले आहे ही शाळा गणोरी या गावात विनापरवाना चालते, असा आरोपही पँथरने केले आहे. ही शाळा तात्काळ बंद करा, या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत या शाळेवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील असा इशारा पँथरचे लक्ष्मण भुतकर, धम्मपाल दांडगे यांनी दिला आहे. यावेळी दशरथ कांबळे, राधाकिसन पटेकर, गौतम पगारे, मधुकर आरक, जगदेव जाधव, संजय सरोदे, उत्तम डोंगरे, महिला आघाडीच्या सुभद्राबाई कासारे, पार्वतीबाई घोरपडे आदी उपस्थित होते.












