अमळनेर व लखमापूर येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

Foto
आश्वासनानंतर तात्पुरती माघार

गंगापूर, (प्रतिनिधी) तालुक्यातील अमळनेर व लखमापूर येथील धरणग्रस्त शेतकऱ्याऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी (ता. १८) अमळनेर वस्ती येथे साडे पाच तास पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. सकाळी शेतकरी जायकवाडी बॅकवॉटर गोदावरी नदीच्या पाण्यात उतरून आंदोलन सुरू केले होते. अखेर प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी तूर्तास आंदोलन मागे घेतले.
यापूर्वी २३ डिसेंबर २०२५ रोजीही या शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले होते. त्यावेळी शेतजमिनीची संयुक्त मोजणी करून न्याय देण्याचे, पीक नुकसानभरपाई दोन महिन्यांत बाजारभावानुसार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात संबंधितविभागाकडून काही शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत चुकीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच नुकसानभरपाईही अद्याप न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. आंदोलनाची दखल घेत जायकवाडी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता दीपककुमार डोंगरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

  -- आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद--
आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. पुन्हा संयुक्त मोजणी करून सुधारित अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात येईल, असे लेखी आश्वासन डोंगरे यांनी दिले. यावेळी नायब तहसीलदार सचिन वाघमारे तसेच जायकवाडी पाटबंधारे विभाग, गंगापूर येथील शाखा अभियंता नेहा धुळे उपस्थित होत्या. 

प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची तात्काळ अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनात इसाभाई पठाण, बालचंद पंडित, समद पठाण, राधेश्याम कोल्हे, शेतकरी नेते भाऊसाहेब शेळके, संतोष टेकाळे आदी शेतकरी सहभागी झाले होते.