महाराष्ट्रात मृत्यूचे तांडव तीन अपघातात १७ ठार , सातार्‍यातील ८ तर धुळ्यातील अपघातात ५ तर जुन्नर परिसरात चौघांचा मृत्यू , विचित्र अपघातात बचावकार्य सुरू असतानाच ट्रॅव्हल्सने चिरडले !!

Foto
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र थांबता थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात रविवारी रात्र ते सोमवारी पहाटेच्या दरम्यान तीन मोठे आणि अत्यंत भीषण अपघात घडले. सातारा जिल्ह्यातील आंबेनळी घाट, मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग घाट आणि अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर तीन अपघात झाले. या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तब्बल १७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर १० ते १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे लळिंग घाटात अपघातग्रस्तांसाठी बचाव कार्य चालू असतानाही विचित्र अपघात झाला.

यातील एक भीषण अपघात आंबेनळी घाटात रविवारी (२४ मे) रात्री  झाला. त्यात एक स्कॉर्पिओ गाडी अंदाजे ९०० फूट खोल दरीत कोसळली. या घटनेत कारमधील आठ जणांचा जागेवरच मृत्यू झाला असून, त्यातील तिघांचे मृतदेह वर आणण्यात यश आले आहे. महाबळेश्वर ते पोलादपूर दरम्यान घाटात ही घटना घडली आहे. तर धुळे शहरानजिक लळिंग घाटात झालेल्या दुसर्‍या एका अपघातात सोमवारी पहाटे वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रक व खाजगी ट्रॅव्हलच्या  तिहेरी अपघात झाला. या भीषण अपघातात ५ जण ठार तर २८ जण जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावर आंबेनळी घाटातून गाडी जात होती. ही गाडी ९०० फूट खोल दरीत कोसळली. गाडीतील ८ जणांचा जागीच मृत्यू झाला असून, महामार्ग पोलिसांना घटनेची माहिती मिळताच मदत मोहीम सुरू करण्यात आली. आसगावमधील हे तरूण कोकणात दापोली, हर्णे येथे फिरायला गेले होते. परतीच्या प्रवासात आज पहाटे हा अपघात झाला.

रात्रीपासूनच बचाव कार्य
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनातील अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. महाबळेश्वर ट्रेकर्स व प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमच्या मदतीने रात्री १० वाजता मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. हा अपघात कसा घडला, याबद्दल मात्र अद्याप कारण समोर आलेले नाही. ३ जणांचे मृतदेह दरीमधून काढण्यात यश आले आहे.  रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर पोलिस ठाणे हद्दीत असणारा हा परिसर असून २८ जुलै २०१८ रोजी याच परिसरात दापोली कृषिविद्यापीठमधील शिक्षकांच्या बसचा अपघात होऊन एकूण ३३ जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. अरुंद रस्ते, रखडलेले कामे, तुटलेले बरीगेट्स आणि अपुरी व्यवस्था यामुळे सातत्याने या घाटात अपघात होत आहेत.

अपघात झाला त्यावेळी गाडीमध्ये कोण-कोण होते?
ज्या गाडीचा अपघात झाला, त्या गाडीत महेश अनिल पवार (वय २५), आदित्य अशोक साळुंखे (वय २१), रितेश राजेंद्र लोखंडे (वय २५), सुहास जितेंद्र लोखंडे (वय २०), अशं समीर चव्हाण (वय १८), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २१), अनिल अभिमन्यू शिंगटे (वय २५) आणि नितीन किसन नायकोंडे (वय ३५) हे प्रवास करत होते.

धुळ्याजवळ भीषण तिहेरी अपघात
दरम्यान धुळे शहरानजिक लळिंग घाटात झालेल्या दुसर्‍या एका अपघातात सोमवारी पहाटे वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रक व खाजगी ट्रॅव्हलच्या  तिहेरी अपघात झाला. या भीषण अपघातात ६ जण ठार तर २८ जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून एकूण ३३ व्यक्तींना तातडीने भाऊसाहेब हिरे वैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र, या ३३ पैकी ५ जणांचा रुग्णालयात आणण्यापूर्वीच  मृत्यू झाला होता. या ६ मृतांपैकी आतापर्यंत केवळ एकाच व्यक्तीची ओळख पटू शकली असून, मनोज प्रकाश नरव्हाळ असे त्याचे नाव आहे. ट्रकचालक मनोज नरवाळ हा मालेगाव येथील रहिवासी आहे. उर्वरित ४ मृतांची ओळख पटवण्याचे काम प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे.  गंभीर व किरकोळ जखमी झालेल्या उर्वरित २८ रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या सर्व २८ रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले आहे.  या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने रुग्णालयात धाव घेतली आहे.

एसटी बसने दुचाकीला चिरडले; चार जणांचा जागीच मृत्यू
अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील जुन्नर परिसरात तिसरा अपघात घडला. कल्याणकडून आळेफाट्याच्या दिशेने जात असताना एका एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, एसटी बसखाली चिरडल्या गेल्याने दुचाकीवरील चारही जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.