नांदेड : नांदेडमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास तीन जणांची हत्या झाल्याची थरारक घटना घडली आहे. नांदेड मधील डी मार्ट परिसरामध्ये असलेल्या ई-स्क्वेअरच्या बाजूला हे हत्याकांड घडलेला आहे. अरिजितसिंग चव्हाण याचा या घटनेत मृत्यू झाला आहे. ई-स्क्वेअरच्या बाजूला रात्री दीड वाजण्याच्या सुमारास जुन्यावादाच्या कारणातून काही गुन्हेगारांमध्ये तलवार आणि खंजीराने मारहाण झाली, या घटनेत सय्यद आवेज, सय्यद खलील आणि घनश्याम रेड्डी, मोहमद अरबाज आणि इतर अज्ञात हल्लेखोरांनी अरिजितसिंग चव्हाणवर हल्ला केला. धारदार शस्त्रांनी वार केल्याने अरिजितसिंग चव्हाण (वय २५) याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यात जखमी सय्यद आवेज सय्यद खलील आणि आणखी एका युवकाला पोलिसांनी सरकारी रुग्णालयात दाखल केला. त्यानंतर अरिजितसिंगचा भाऊ चाकू घेऊन दवाखान्यात गेला आणि जखमी असलेल्या सय्यद आवेज सय्यद खलील (वय २७) आणि मोहंमद अरबाज मोहंमद फारुख (वय २३) या दोघांवरती दवाखान्यातच चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला.
दोन्ही टोळीमधील तिघे जण गंभीर जखमी
पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास दोन टोळ्यांच्यामध्ये ही घटना घडली आहे, ही घटना ई-स्क्वेअर परिसरात घडली. त्या ठिकाणी दोन्ही टोळीमधील तिघे जण गंभीर जखमी झाले होते. दोन्ही टोळ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठी आहे. या एका टोळीतील अनिल पंजाबी हा सध्या जेलमध्ये आहे. यामधील साहिल देखील दोन महिन्यापूर्वी जेलमधून बाहेर आला होता. त्यांच्या टोळीवरती आधी देखील कारवाई झालेली आहे, त्या टोळीतील काहींवर आधीही कडक कारवाई झालेली आहे, तर दुसरीकडे अरिजितसिंग चव्हाण यांच्यावर देखील नऊ गुन्हे दाखल होते, त्यांच्यासोबत आणखी एक आरोपी होता ज्याला आम्ही ताब्यात घेतले आहे, जो जखमी आहे, त्याच्यावर देखील २०२५ मध्ये कारवाई झाली होती, एकंदरीत दोन्ही डोळ्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठी आहे, पोलिसांकडून प्रतिबंधक कारवाई देखील त्यांच्यावर केलेली होती, यांच्यावरती हद्दपार सारखी कारवाई देखील झालेली आहे.नया दोन्ही टोळ्यांच्या वादामध्ये एका टोळीतील अरबाज आणि आवेज या दोघांचाही मृत्यू झालेला आहे तर दुसरी बाजू म्हणजे अरिजितसिंग चव्हाणचा देखील मृत्यू झालेला आहे, या टोळीच्या घटनेत एकंदरीत तीन जणांचा मृत्यू झालेला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अरिजितसिंगचा मृतदेह होता, त्याच ठिकाणी आवेजवर वार...
यामधील दोघेजण घटनास्थळी गंभीर जखमी झालेले होते, आवेज देखील गंभीर जखमी होता, त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर त्याला विष्णुपुरी येथे रेफर करण्यात आले, तिथे तो खूप गंभीर स्वरूपाचा जखमी अवस्थेत गेला होता, तिथे आधीच अरिजितसिंगचे भाऊ आणि वडील गेलेले होते, अरिजितसिंगचा मृतदेह तिथे होता, त्याच ठिकाणी आवेज वर तिथे वार झाला, तो आधी ही गंभीर जखमी होता, शेवटी त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला, यामध्ये दोन एफआयआर झाले आहेत, ते दोन्ही क्रॉस आहेत, भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्येच दोन क्रॉस एफआयआर दाखल होतील. एक आहे ती अरिजितसिंग चव्हाणच्या फॅमिलीची आणि दुसरी आवेज किंवा अरबाज या दोघांपैकी एकाची एफआयआर घेऊन मर्डरचे गुन्हे दाखल करणार आहोत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
तो धुरंधर सिनेमा बघून बाहेर आला...
या वादामध्ये पहिल्यांदा मृत्यमुखी पडलेला अरिजितसिंग चव्हाण हा बुलेट गाडीवर आला होता, त्याच्यासोबत आणखी दोन जण होते. तो धुरंधर सिनेमा बघून बाहेर आला होता, याच दरम्यान ही वादाची घटना घडली आहे, ४ आरोपी ताब्यात आहेत, अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील कॅनाल रोड परिसरातील असलेल्या ई-स्क्वेअर परिसरात काल (शुक्रवारी) रात्री सय्यद आवेज, सय्यद खलील आणि घनश्याम रेड्डी, मोहमद अरबाज आणि इतर अज्ञात हल्लेखोरांनी अरिजितसिंग चव्हाणवर हल्ला केला. धारदार शस्त्रांनी वार केल्याने अरिजितसिंग चव्हाणचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यात जखमी सय्यद आवेज सय्यद खलील आणि आणखी मोहंमद अरबाज मोहंमद फारुख पोलिसांनी सरकारी रुग्णालयात नेले. तिथून आवेजला दुसर्या रूग्णालयात हलवण्यात आले तिथे त्याच्यावरती वार झाले, त्याचवेळी उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला आहे.