पुणे : पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड किल्ला चढताना ३५ वर्षीय पर्यटक जिग्नेश खंडाळकरचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ज्येष्ठ पत्रकार स. सो. खंडाळकर यांचा जिग्नेश हा मुलगा होता. काल (शनिवारी १० ऑक्टोबर) रोजी दुपारी दोनच्या सुमारास घटना घडली आहे. पुण्यातील हडपसरच्या भेकराईनगरमध्ये तो वास्तव्यास होता. पुण्यातून आपल्या दोन मित्रांसह तो राजगड किल्ला पाहण्यासाठी गेला होता. दरम्यान पाल बुद्रुक मार्गाने किल्ला चढताना जिज्ञेशला अचानक चक्कर येऊन तो बेशुद्ध पडला. हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज आहे; पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी मदतीसाठी धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून हे तिघेजण किल्ले राजगड पाहण्यासाठी आले होते. पद्मावती माची परिसरात आल्यानंतर त्यातील जिज्ञेश याला थकवा जाणवू लागल्याने त्याला त्याच ठिकाणी बसवून इतर दोघे जण किल्ल्याकडे गेले. काही वेळानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागले. गडावर बसलेल्या इतर पर्यटकांनी त्याला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास वेल्हे पोलिस करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच किल्ले राजगडावर कार्यरत असलेले पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी विशाल पिलावरे आणि दीपक पिलावरे, तसेच स्थानिक नागरिक शंकर रसाळ, आकाश जाधव, लहू खरात आणि महावितरण विभागाचे कर्मचारी मदतीसाठी धावून आले. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करत संबंधित तरुणाला स्ट्रेचरच्या साहाय्याने गडाच्या पायथ्याशी आणले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. जिग्नेश मूळचा छत्रपती संभाजीनगर येथील असून, सध्या पुण्यातील हडपसर परिसरातील भेकराईनगर येथे राहत होता. याबाबतची माहिती वेल्हे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी किशोर शेवते यांनी दिली.