आरापूर, भेंडाळा एमआयडीसीचा दर निश्तिचा विषय लांबणीवर

Foto

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : प्रस्तावित भेंडाळा आणि आरापूर एमआयडीसीचा दर निश्चिती करण्याचा विषय गुरुवारी झालेल्या एमआयडीसीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत चर्चेला आलाच नाही. यामुळे दोन्ही एमआयडीसीचा विषय आणखी काही दिवस लांबणीवर पडल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये आता भूखंड शिल्लक नाही. दुसरीकडे मात्र या वसाहतीत अथवा जवळपास भूखंड मिळावे, यासाठी उद्योजकांकडून सतत एमआयडीसीकडे अर्ज दाखल होतात. 
मागणीनुसार उद्योगांना भूखंड उपलब्ध करण्याच्या उद्देशाने शासनाने आरापुर ही नवीन औद्योगिक वसाहत प्रस्तावित केली. गवळी शिवरा, आरापुर आणि सुलतानाबाद या गावातील सुमारे ७५२ हेक्टर जमीन यासाठी अधिसूचीत आहे. या गावातील शेतमालकांची जमीन या वसाहतीसाठी संपादित होणार आहे. या जमिनीचा मोबदला निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी एमआयडीसीच्या उच्चाधिकार समितीकडे प्रस्तावित दराची शिफारस केली आहे. या मोबदल्याच्या दराविषयी एमआयडीसीच्या उच्चाधिकार समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र काही कारणास्तव उच्चाधिकार समितीसमोर आरापुरचा विषय ठेवला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.