बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची सोयही पुरेसी : आरोग्य विभागाचा दावा
साधारणतः दोन तीन आठवड्यांपूर्वी दररोज 1 हजार कोरोना टेस्ट केल्यानंतर 350 ते 400 पॉझिटिव्ह रुग्ण आढळत होते. आज शहरात दररोज 3 हजार अँटीजन टेस्ट होत आहेत. त्यात दोनशेच्या आसपास पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. ही आकडेवारी सुखावणारी असून शहराची पॉझिटिव्हिटी घटत असल्याचे द्योतक आहे. दरम्यान शहरात कोरोना रुग्णांसाठी पुरेसे बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची व्यवस्था असल्याची असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुंदर कुलकर्णी यांनी केला आहे.
साधारणता: मार्चच्या पहिल्या आठवड्यात शहरात कोरोना संसर्गाचा प्रसार झाला. एप्रिल महिन्यात हळूहळू रुग्ण संख्या वाढली. मात्र मे आणि जून हे दोन महिने कोरोनाचे पिक पिरिएड मानले गेले. जुलै महिन्यातही पहिल्या आठवड्यात रुग्ण संख्या तब्बल चारशेच्या पुढे वाढू लागली. राज्यात पहिल्या चार शहरात औरंगाबादची गणना झाली. मुंबई -ठाणे, पुणे या शहरांशी औरंगाबाद ने स्पर्धा केली होती. परिस्थिती हाताबाहेर जाते की काय शक्यता व्यक्त होऊ लागली. मात्र प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा वेळीच सावध होत अँटीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. या टेस्टमुळे परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. प्रशासनाने जाहीर केले लॉक डाऊन आणि शहराच्या एन्ट्री पॉईंटवर करण्यात येत असलेल्या अँटीजन टेस्ट यामुळे मोठा फरक पडला. व्यापार्यांना टेस्टची केलेली सक्ती त्याचबरोबर दूध, फळ भाज्या विक्रेत्यांची टेस्ट केल्याचा चांगला परिणाम दिसून आला.
पॉझिटिव्ह संख्या निम्म्यावर
दोन आठवड्यांपूर्वी साधारणतः एक हजार ते दीड हजार टेस्ट होत होत्या. त्यावेळी रुग्ण संख्या चारशेच्या आसपास दिसून आली. आता दररोज तीन हजारावर अँटीजन टेस्ट होत आहेत. रुग्ण संख्या 200 च्या जवळपास आली आहे. एकंदरीत टेस्टची संख्या वाढूनही पॉझिटिव्ह रुग्ण त्यामानाने कमी आढळून येत असल्याचे दिसून येते.
बेड व्हेेंटीलेटर पुरेसे
घाटी जिल्हा रुग्णालयासह शहरातील खासगी रुग्णालयांकडे पुरेसे बेड आणि व्हेंटिलेटर असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. मनपाकडे जवळपास 500 तर जिल्हा रुग्णालयात जवळपास 120 ऑक्सिजन बेड तयार आहेत. कोविड केअर सेंटरमध्येही पुरेसे ऑक्सी सिलेंडर आहेत. जिल्हा रुग्णालयाने घाटी हॉस्पिटलला 32, एमजीएम हॉस्पिटलला 8, अजिंठा हॉस्पिटलला 2, तर सावंगीकर हॉस्पिटलला 2 अशाप्रकारे जवळपास 44 व्हेंटिलेटर पुरवले असल्याची माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली.
आणखी 80 व्हेंटिलेटर येणार
दरम्यान, गंभीर रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले व्हेंटिलेटर पुरेसे असून आठवडाभरात आणखी 80 व्हेंटिलेटर शहरासाठी मिळणार आहेत. त्यामुळे घाटी सह खाजगी रुग्णालयांनाही व्हेंटिलेटर देण्यात अडचण येणार नाही, असा दावाही डॉक्टर कुलकर्णी यांनी केला.