नवी दिल्ली : नीट परीक्षेतील घोटाळ्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी अनिश्चितकालीन उपोषणावर बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या ढासळत्या प्रकृतीची दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. प्रत्येक नागरिकाचे जीवन मौल्यवान आहे आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे ही सरकारची जबाबदारी आहे, अशी अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी न्यायालयाने सुनावणी दरम्यान केली. वांगचुक यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करत उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला तातडीचे निर्देश दिले आहेत.
सरकारी डॉक्टरांनी वांगचुक यांची दररोज वैद्यकीय तपासणी करावी आणि त्यांच्या आरोग्यावर नियमितपणे लक्ष ठेवावे, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. यावर केंद्र सरकारच्या वतीने न्यायालयाला आश्वस्त करण्यात आले की, वांगचुक यांच्या आरोग्याची दररोज काळजीपूर्वक तपासणी केली जात आहे.
दुसरीकडे, सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज (१६ जुलै) १९ वा दिवस आहे. याचिकाकर्ते राकेश कुमार सैनी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. या याचिकेत केंद्र आणि दिल्ली सरकारला वांगचुक यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचे, त्यांना जीव वाचवणारी काळजी, आपत्कालीन उपचार आणि आवश्यक पोषण पुरवण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच, जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर गरज पडल्यास त्यांना जबरदस्तीने अन्न भरवण्याची परवानगी द्यावी, अशीही विनंती करण्यात आली होती.
१८ दिवसांत तब्बल ९ किलो वजन घटले
कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) आंदोलनात सहभागी होऊन सोनम वांगचुक २० जूनपासून जंतर-मंतर येथे उपोषणाला बसले आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी त्यांचे हे आंदोलन सुरू आहे. सलग १९ दिवस अन्नत्याग केल्यामुळे वांगचुक यांची प्रकृती कमालीची खालावली आहे. अवघ्या १८ दिवसांत त्यांचे वजन ८.९ किलोने घटून आता ५७.१५ किलोवर आले आहे. डॉक्टरांच्या मते, ते पूर्णपणे शुद्धीवर असले तरी सुरू असलेल्या उपोषणाचा त्यांच्या अंतर्गत अवयवांवर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही चिंता
वांगचुक यांच्या आंदोलनाला सरकारकडून केवळ मौन मिळत असल्याचा आरोप सीजेपीने केला आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सरकारवर तोफ डागत, सरकार जबाबदारी टाळत असून त्यांची वृत्ती क्रूर आहे, अशी टीका केली. दुसरीकडे, या आंदोलनाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पडसाद उमटत आहेत. अमेरिकेतील हिंदू फॉर ह्युमन राइट्स या संघटनेने वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आवाहन करत, आंदोलकांशी त्वरित संवाद साधावा, त्यांच्या मागण्यांना ठोस प्रतिसाद द्यावा आणि परीक्षा पद्धतीत उत्तरदायित्व सुनिश्चित करावे, अशी मागणी केली आहे.