नवी दिल्ली : माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. अद्याप प्रकाशित न झालेल्या या पुस्तकाच्या प्रती वितरित झाल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आता दिल्ली पोलिसांनी या पुस्तकाचे प्रकाशक असलेल्या पेंग्विन इंडियाला नोटीस पाठवली आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पेंग्विन इंडियाला नोटीस बजावली आहे. या नोटिशीद्वारे अनेक प्रश्न विचारण्यात आले असून त्यांची उत्तरे मागवण्यात आली आहेत, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे.
जनरल नरवणे यांचे वादात सापडलेले पुस्तकाच्या प्रकाशनाला सरकारकडून मंजुरी मिळालेली नाही. पेग्विन इंडियाने देखील हे पुस्तक भारतात प्रकाशित झालेले नाही, असा दावा केला होता. त्यानंतर पुस्तक स्वरुपात आणि डिजिटल स्वरुपामध्ये त्याच्या प्रती वितरित कशा झाल्या याचा तपास दिल्ली पोलिस करत आहे. या प्रकरणात पेग्विन प्रकाशनाला दोन दिवसांत दोन स्पष्टीकरणे एक्सवरून प्रसिद्ध करावी लागली आहेत.
सोमवारी संध्याकाळी प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये पेग्विनने ङ्गफोर स्टार्स ऑफ डेस्टिनीफ हे पुस्तक कुठल्याही स्वरुपात प्रकाशित झाले नसल्याचा दावा केला आहे. यानंतर पुस्तकासंदर्भात सुरू असलेल्या वादावर व्यक्त होत जनरल नरवणे यांनी पेग्विन इंडियाने मंगळवारी एक्सवर प्रसिद्ध केलेले निवेदन शेअर केले आणि त्याबरोबर ही पुस्तकाची सद्यस्थिती आहे, असे म्हटले आहे.
पुस्तकाबाबत पेंग्विन इंडियाचा खुलासा
घोषित पुस्तक, प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असलेले पुस्तक आणि प्रकाशित पुस्तक ही एकच बाब नव्हे. १ ) पुस्तकाची घोषणा: पुस्तक नियोजित आहे, ते अद्याप प्रकाशित झालेले नाही किंवा विक्रीसाठी उपलब्ध नाही. २) पुस्तक प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध प्री-ऑर्डर ही एक नियमित प्रकाशन पद्धत आहे. ती वाचकांना आणि किरकोळ विक्रेत्यांना आगाऊ ऑर्डर देण्याची परवानगी देते. पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही किंवा उपलब्ध नाही. ३) भविष्यातील तारखेसाठी अनुसूचित पुस्तक: नियोजित प्रकाशन तारीख म्हणजे पुस्तक प्रकाशनासाठी नियोजित आहे. याचा अर्थ असा नाही की पुस्तक प्रकाशित झाले आहे. ४) प्रकाशित पुस्तक: पुस्तक किरकोळ विक्रेत्यांकडे (दुकानात) खरेदीसाठी उपलब्ध असेल तरच ते प्रकाशित झालेले असते.
नेमका वाद काय आहे?
जनरल नरवणेंच्या फोर स्टार्स ऑफ डेस्टिनीयांच्या पुस्तकामध्ये चिनी घुसखोरीसंदर्भात माहिती देण्यात आल्याचा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केला होता. इतकेच नाही तर राहुल गांधींनी या पुस्तकातील काही उतारे लोकसभेत वाचून दाखवण्याचा प्रयत्न केला, ज्याला केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोध केला होता. त्यानंतर राहुल गांधींनी या पुस्तकाची प्रत संसदेच्या आवारात पत्रकारांना दाखवत हे पुस्तक उपलब्ध असल्याचा दावा केला होता.