रांजणगाव ते लिंबेजळगाव शहरबस सेवेची मागणी

Foto
वाळूज महानगर, (प्रतिनिधी) : वाळूज औद्योगिक क्षेत्रातील रांजणगाव शेणपुंजी, कमळापूर-वाळूज, पथकर नाका मार्गे लिंबेजळगाव अशी शहरबस सेवा सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दत्ता लुटे यांनी निवेदनाद्वारे स्मार्ट सिटी कार्यालयाकडे केली आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका स्मार्ट शहरबस सेवा रांजणगावपर्यंत सुरू आहे. मात्र कामगारांची वाढती रहदारी लक्षात घेऊन ही बससेवा रांजणगाव-कमळापूर, वाळूज मार्गे लिंबेजळगाव अशी नव्याने सुरू करावी. विशेष म्हणजे रांजणगाव ते वाळूज या रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. यामुळे लिंबेजळगाव ते एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील कामगार, विद्यार्थी, रुग्ण या रस्त्याने नेहमी ये-जा करतात. तसेच वाळूज आठवडी बाजारात शेतकरी शेती मालाची ने आण करतात. 

यामुळे रस्त्यावर दळणवळण रहदारीची मोठया प्रमाणात गर्दी असते. या भागात बससेवा सुरू झाल्यास मनपाच्या महसूल वाढणार आहे. तसेच खासगी वाहने प्रवाशांची अव्वाच्या सव्वा भाडे घेऊन, लूट करतात. यामुळे अनेकांच्या खिशाला कात्री लागत आहे.

 प्रवाशांची होणारी आर्थिक लूट लक्षात घेऊन स्मार्ट सिटी बस अधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते दत्ता लुटे यांनी लेखी निवेदन देऊन, शहरबस सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे.