गंगापूर दुय्यम निबंधक अधिकारी यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी

Foto
गंगापूर (प्रतिनिधी) : गंगापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील सह दुय्यम निबंधक अजित आसराजी वीर यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दक्षता पथकामार्फत चौकशी सुरू करण्यात आली असून, संबंधित कार्यालयाकडून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल व प्रकरणाशी संबंधित सर्व अभिलेख मागविण्यात आले आहेत.


लक्ष्मीनारायण छोटेलाल राठोड, यांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी संबंधित तक्रार अर्ज सादर केला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित कार्यालयाला यापूर्वी पत्राद्वारे अहवाल व आवश्यक अभिलेख सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, अद्याप अहवाल व अभिलेख प्राप्त झाले नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या ४ डिसेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार दक्षता पथकामार्फत तक्रारीची चौकशी करून मुदतीत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत. 

त्यानुसार संबंधित कार्यालयाने तक्रारीतील प्रकरणाशी निगडित सर्व अभिलेख व स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल दक्षता पथकास ५ जून २०२६ पूर्वी उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश सहायक आयुक्त (महसूल) तथा सदस्य सचिव शुभांगी आंधळे यांनी दिले आहेत. सह दुय्यम निबंधकाविरुद्ध फौजदारी अथवा निलंबनाची कारवाई होते का, याकडे आता लक्ष लागले आहे. गंगापूर सह दुय्यम निबंधक अजित वीर यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीची दक्षता पथकामार्फत चौकशी सुरू झाल्याचे समजले आहे.

या प्रकरणात चौकशीनंतर संबंधित ही माझ्या तक्रारीतील सर्व मुद्द्यांची निष्पक्ष व सखोल चौकशी करावी, अशी माझी मागणी आहे. चौकशीत दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध नियमानुसार फौजदारी तसेच निलंबनाची कठोर कारवाई करावी. या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा प्रशासकीय दबाव न ठेवता पारदर्शकपणे चौकशी करून मला न्याय मिळावा, ही माझी अपेक्षा आहे.
- लक्ष्मीनारायण राठोड, तक्रारदार