भूमी अभिलेख गंगापूरसह जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षक कार्यालयात हजेरी मशीन बसविण्याची मागणी

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) गंगापूरसह जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची पारदर्शक नोंद राहण्यासाठी तातडीने बायोमेट्रिक हजेरी मशीन बसविण्यात यावी, अशी मागणी उपसंचालक, भूमी अभिलेख, संभाजीनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये दररोज तालुक्यातील शेकडो नागरिक जमीन मोजणी, नकाशे, सीमांकन, अभिलेख, फेरफार तसेच अन्य कामांसाठी येत असतात. मात्र, अनेक कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणाली उपलब्ध नसल्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची अधिकृत व पारदर्शक नोंद होत नसल्याची व भावना नागरिकांमध्ये आहे.

काही वेळा संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालयात उपलब्ध नसल्याने नागरिकांना ताटकळत राहावे लागते. त्यामुळे नागरिकांचा वेळ व आर्थिक नुकसान होत असून, शासकीय कामांसाठी वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

शासनाच्या पारदर्शक, उत्तरदायी व लोकाभिमुख प्रशासनाच्या उद्दिष्टानुसार भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणाली कार्यान्वित करणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे गंगापूरसह जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयांमध्ये तातडीने बायोमेट्रिक हजेरी मशीन बसविण्याचे आदेश देऊन, अधिकारी व कर्मचाऱ्यांना नियमित बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

या प्रणालीमुळे कार्यालयीन शिस्त, वेळेचे पालन आणि नागरिकांना शासकीय सेवा वेळेत उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे.