आंदोलन करताना अमळनेरच्या गावकऱ्यांना लेखी पत्र दिल्याने जलसमाधी आंदोलन थांबवले
गंगापूर, (प्रतिनिधी) तालुक्यातील अमळनेर व लखमापूर गाव मार्गे श्री क्षेत्र परमानंद गड दत्त मंदिर-गवारे वस्तीपर्यंत जाणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा शिवरस्ता १५ दिवसांत अतिक्रमणमुक्त करू असे लेखी देऊन एक वर्ष उलटले. ग्रामस्थांनी यासाठी तीन वेळा निवेदन व स्मरणपत्र दिले.
तसेच गावठाण पुनवर्सन चा अधिकृत गाव नकाशा मिळावा यासाठी अनेदा मागणी करून ही प्रशासनाने दखल न घेतल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. सकाळी दहा ते दुपारी चार पर्यंत चाललेल्या सहा तास आंदोलन दरम्यान प्रशासनाने पुन्हा लेखी आश्वासन लिहून दिल्यानंतर सदरील आंदोलन तूर्तास मागे घेतले. सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत अमळनेर शिवारातील जायकवाडी फुगवटा क्षेत्राच्या पुराच्या पाण्यात शेतकरी व ग्रामस्थ उतरले होते.
अतिक्रमणामुळे शालेय बस या रस्त्याने ये-जा करू शकत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दीड किलोमीटरहून अधिक अंतर चिखल तुडवत शाळेत जावे लागत आहे. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर, ट्रक आणि मालवाहतूक करणारी वाहनेही या रस्त्याने जाऊ शकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत किंवा हायवेपर्यंत नेण्यास मोठी अडचण होत आहे.
-- मुख्यमंत्री ग्रामसडक वरील अतिक्रमण तात्काळ हटवावे --
अमळनेर गावठाण पुनर्वसनचा अधिकृत गाव नकाशा द्यावा. शालेय वाहतूक आणि शेतमाल वाहतुकीसाठी रस्ता कायमस्वरूपी मोकळा करावा. या प्रमुख मागण्या ग्रामस्थांनी केल्या.
-- प्रशासनाचे लेखी आश्वासन, आंदोलन तात्पुरते स्थगित --
यावेळी प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार सचिन वाघमारे यांनी प्रशासन च्या वतीने मध्यस्थी करून आंदोलक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन येत्या दोन महिन्यात अतिक्रमण काढण्यात येईल. असे लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी तूर्तास आंदोलन मागे घेतले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता एस. ई. सातपुते, कनिष्ठ अभियंता एस. बी. अकुळवार, भूमी अभिलेख चे मोजणी अधिकारी श्रीकांत निंबोरकर, मंडळ अधिकारी मीना सूक्ते, या आंदोलनात रामेश्वर मिसाळ, सुखदेव भणगे, जनार्धन मिसाळ, भाऊसाहेब पंडित, खंडेराव गवारे, लवकुश करजुले, यामाजी जवादे, सलीम पठाण, समद शेख, सुधाकर मिसाळ अक्रम पठाण, शॉकत पठाण, रावसाहेब सावंत, दत्तू गवारे यांनी सहभाग घेतला होता. यावेळी ग्राम
महसूल अधिकारी पल्लवी लोणे, रोहिदास तांदळे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रशासनाने असे दिले लेखी पत्र तालुक्यातील अमळनेर ग्रामीण रस्ता क्र. १२६ या रस्त्या शेजारी अतिक्रमण झालेले आहे. ते काढणे बाबत. उप अधीश्यक, भुमि अभिलेख, गंगापूर यांना १३ रोजी शासकीय मोजणी करून हद्द निश्चित करण्यासाठी पत्र दिलेले आहे.
रित्तसर मोजणी फी भरल्यानंतर अंदाजे दीड ते दोन महिन्याच्या कालावधीमध्ये रस्त्याची हद्द कायम करून दिल्यानंतर नियमानुसार संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या समनव्याने अतिक्रमण काढण्याचे कार्यवाही करण्यात येईल. तसेच अमळनेर पुनवर्सन गावठाण नकाशा देखील १५ दिवसात उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामुळे तुर्तास जल समाधी आंदोलन मागे घेण्यात यावे असे लेखी पत्र देण्यात आले.














