छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आरएसएस कार्यालयावर जन आक्रोश मोर्चाची घोषणा केली होती. त्यानुसार आज क्रांती चौकात आरएसएस विरोधात वंचीत बहुजन आघाडी मोर्चा काढण्यासाठी रस्त्यावर उतरली आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी संघाच्या विरोधात घोषणा देत क्रांती चौक दणाणून सोडला. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही संघाच्या भाग्यनगर येथील कार्यलयावर मोर्चा नेण्याचा निर्धार युवानेते सुजात आंबेडकर यांनी केला होता. त्यामुळे सकाळपासूनच क्रांती चौकात मोठा बंदोबस्त होता.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर धडकण्यासाठी दुपारी बारा वाजेच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. क्रांती चौक ते आरएसएस कार्यालय असा जन आक्रोश मोर्चाचे स्वरूप होते. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. यावेळी आरएसएसवर बंदी घाला तसेच आरएसएसचे नोंदणी प्रमाणपत्र द्या अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. अशी मागणी वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने सुजात आंबेडकर, अमित भुईगळ, जिल्हाध्यक्ष रुपचंद गाडेकर, अरुंधती शिरसाठ, रामेश्वर तायडे, ॲड. पंकज बनसोडे, योगेश बन, राहुल मकासरेसह आदीं कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
दरम्यान पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी, कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढण्यावर वंचित बहुजन आघाडी ठाम आहे. संघावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी या मोर्चात फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेचे अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागीझाले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली असून, अनेक कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. खबरदारी म्हणून कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कार्यकर्त्यांवर झाला होता गुन्हा दाखल
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आरएसएसची नोंदणी सुरू होती. महाविद्यालयात नोंदणी कशासाठी? असा प्रश्न वंचीत बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर आरएसएस आणि वंचीत बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. त्यावर त्यांच्यात शाब्दिक चकमक देखील झाली होती. यावर वंचीत बहुजन आघाडीच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे नोंदविण्यात आले. हे गुन्हे मागे घ्यावे आणि गुन्हे नोंदविण्यावर देखील अट्रॉसीटीचा गुन्हा नोंदविण्यात यावा अशी वंचितची मागणी आहे.
गुन्हे मागे घ्यावे: राहुल मकासरे
वंचित बहुजन आघाडी व श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे आरएसएसच्या विरोधात प्रत्यक्ष लढणारे एकमेव व्यक्ती आहेत. व त्यांचे कार्यकर्ते म्हणून आरएसएस विरोधात आम्ही प्रत्यक्षात भूमिका घेऊन काम करत आहोत. आज प्रशासनाने आमच्यावर दबावाखाली येऊ गुन्हे नोंद केले. ह्या गुन्ह्याला कुठलाच आधार नाही. फिर्यादी संघ असायला पाहिजे होता. परंतु यिथे फिर्यादी पोलिस आहेत ही संशयास्पद भूमिका आहे. असे वंचीत बहुजन युवा आघाडी पश्चिम शहर अध्यक्ष राहुल मकासरे यांनी स्पष्ट केले.