मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी न देण्याची मागणी, उद्या सुनावणी होणार

Foto
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करण्यासाठी अंतरवाली सराटीतून काल निघाले आहेत. मनोज जरांगे यांच्यावतीनं मुंबई पोलिसांकडे परवानगीसाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र, मुंबई पोलिसांकडून गेल्यावर्षीच्या आंदोलनाचा दाखला देत परवानगी नाकारण्यात आली होती. आता नव्या अपडेटनुसार मुंबई पोलिसांकडून आझाद मैदानात करण्यात येणाऱ्या आंदोलनाची सविस्तर माहिती मागवण्यात आली आहे. मुंबई आंदोलनासाठी येणाऱ्या व्यक्तींची नावं, स्वयंसेवकांची नाव पोलिसांकडून मागण्यात आली आहेत. या घडामोडी सुरु असतानाच मनोज जरांगे यांना मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवनागी देण्यात येऊ नये यासाठी एमी फाऊंडेशनतर्फे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती ॲड. महेंद्र रत्ना यांनी दिली.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात याचिका 
मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या प्रस्तावित मराठा आरक्षण आंदोलनासाठी परवानगी न देण्याचे निर्देश देण्याची मागणी एमी फाऊंडेशननं याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. एमी फाऊंडेशन ही एक स्वयंसेवी संस्था आहे, जी सार्वजनिक कल्याण आणि सुरक्षेच्या संरक्षणासाठी समर्पित असल्याचा दावा करते.

2025 मध्ये ही या संस्थेकडून मराठा आरक्षाणाबाबत होणाऱ्या आंदोलनाचा विरोध करत न्यायालयात दाद मागण्यात आली होती. एमी फाऊंडेशनने नुकत्याच केलेल्या याचिकेत मुंबई शहरात, गणपती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो, असं म्हटलं.  या स्थितीत या आंदोलनाचा परवानगी मिळाल्यास मागील वर्षी झालेल्या आंदोलना प्रमाणे सार्वजनिक मार्ग आणि सार्वजनिक जागा बंद होऊ शकतात, असं करण्याचा कोणताही अधिकार आंदोलकांना नाही, ज्यामुळे सर्वसामान्य जनतेला गैरसोय होईल, असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे.

सार्वजनिक सभा, आंदोलने आणि मिरवणुका नियम, 2025’ हे नियम तयार करण्यात आले आहेत आंदोलनकर्त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. तथापि, त्यांना सर्वसामान्य जनतेला गैरसोयीत टाकण्याचा कोणताही अधिकार नाही.सार्वजनिक मार्ग आणि सार्वजनिक जागा अशा प्रकारे आणि तेही अनिश्चित काळासाठी व्यापल्या जाऊ शकत नाहीत.अनिश्चित संख्येचे लोक जेव्हा वाटेल तेव्हा आंदोलनासाठी एकत्र येऊ शकतात. त्यामुळे या आंदोलनाला परवानगी न देण्याबाबत ही याचिका करण्यात आली आहे.

एमी फाऊंडेशन ने दाखल केलेल्या या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला या याचिकेवरील युक्तिवादानंतर न्यायालयाकडून परवानगी मिळते का ? हे पाहणे महत्वाचे आहे. दरम्यान, मुंबईत आंदोलनाचा जायचं की नाही याचा निर्णय मनोज जरांगे घेतील, असं गंगाधर काळकुटे यांनी म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या पत्राला वकिलांकडून उत्तर दिलं जाईल, असं देखील काळकुटे यांनी म्हटलं.