गंगापूर, (प्रतिनिधी): तालुक्यातील मौजे वरझडी (गट क्र. १७, २०, २१, २५) येथे विनापरवानगी व बोगस ग्रामसभा ठरावाच्या आधारे सुरू असलेल्या खदानी व स्टोन क्रेशर प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
याबाबत वरझडी येथील विलास गवळी यांनी ईमेलद्वारे तक्रार सादर केली असून, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलदार गंगापूर यांना १० नोव्हेबर २०२५ व १० डिसेंबर २०२५ रोजी दोन वेळा चौकशी व कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
पंचायत समिती गंगापूरच्या २१ नोव्हेंबर २०२५ च्या चौकशी अहवालानुसार, दि. २९ जून २०२२ रोजी ग्रामसभा झाल्याचे कोणतेही अधिकृत अभिलेख उपलब्ध नाही. तसेच कोरम अपूर्ण असल्याने संबंधित ठराव अवैध ठरतो. तत्कालीन ग्रामसेविका यांनी चुकीचा ठराव सादर केल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या बेकायदेशीर खदानीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. धुळीमुळे पिकांचे नुकसान होत आहे. जनावरांसाठी चरण्याची जागा कमी झाली आहे. ब्लास्टिंगमुळे घरांना तडे जात आहे. जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या उत्खननामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर व झोपेवरही परिणाम होत आहे.
जंगली प्राणी मानवी वस्तीकडे वळत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामसभा व ग्रामपंचायत ठरावानुसार ग्रामस्थांनी या खदानी व क्रेशर तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात विविध तक्रारीही प्रशासनाकडे सादर करण्यात आल्या आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर, आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून वस्तुस्थितीची सखोल चौकशी करून संबंधित खदानी व क्रेशर तात्काळ बंद करण्यासोबतच जबाबदार अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मौजे वरझडी येथे विनापरवानगी आणि बोगस ग्रामसभा ठरावाच्या आधारे सुरू असलेल्या खदानी व स्टोन क्रेशरचा प्रकार अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे. प्रशासनाकडून वारंवार आदेश देऊनही कारवाई होत नसल्याचे दुर्दैवी आहे. यामुळे स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि पर्यावरण यांचे मोठे नुकसान होत आहे. पंचायत समितीच्या चौकशी अहवालात स्पष्टपणे अनियमितता दिसून आली असून, संबंधितांनी नियमांचा सर्रास भंग केला आहे. त्यामुळे अशा बेकायदेशीर कामांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. गरज पडल्यास या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीही करण्यात येईल.
- प्रशांत बंब, आमदार, गंगापूर
बेकायदेशीर खदानी व स्टोन क्रेशरमुळे विनापरवानगी व बोगस ग्रामसभा ठरावाच्या आधारे हा प्रकार सुरू असूनही प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई होत नसल्याची खंत आहे. मी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत, परंतु अजूनही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आता तरी आमदार प्रशांत बंब यांच्याकडे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ खदानी व क्रेशर बंद करावेत. संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आहे.
- विलास गवळी, सामाजिक कार्यकर्ता












