सिल्लोड, (प्रतिनिधी) : माहेराहून मोबाईल दुकानासाठी २५ लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करीत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला उपाशी ठेवत मारहाण केल्याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध मंगळवारी सकाळी १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी निलोफर बेगम बिलालखान (वय २४, रा. कोहीनूर कॉलनी सिल्लोड) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार बिलालखान जावेदखान, जावेदखान रशीदखान, शबाना बेगम जावेदखान, यासेर जावेद खान, फरहा बेगम अयाज शेख
आणि सना बेगम जफर बेग यांच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार, मारहाण व धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
निलोफर बेगम हिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की वरील सर्व ६ आरोपींनी संगनमत करून माहेराहून २५ लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. पैसे आणण्यासाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच उपाशी ठेवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि घराबाहेर हाकलून दिले. याप्रकरणी २६ ऑगस्ट रोजी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस हवालदार सोनवणे करीत आहेत.















