पैठण तालुक्यातील रखडलेली कामे मार्गी लावण्याची मागणी

Foto
▶ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे तहसीलदारांना निवेदन

पैठण, (प्रतिनिधी): पैठण तालुक्याच्या प्रलंबित विकास योजना मार्गी लावण्याबाबत सरकार उदासीन आहे. मंत्रिमंडळाच्या अनेक बैठकांमध्ये केलेल्या घोषणाही वांझ ठरल्या आहेत. विकासाचा हा अनुशेष भरून काढावा. यासाठी
मराठवाड्याचा विकास, तुमसे ना हो पायेगा हे घोषवाक्य घेऊन शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. 

अशा आशयाचे निवेदन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी व शिवसैनिकांनी महसूल प्रशासनाकडे दिले.
शिवसेना पैठण तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे सदस्य मनोज पेरे, विधानसभा संघटक डॉ. सुनील शिंदे व माजी नगरसेवक प्रकाश वानोळे यांच्या हस्ते देण्यात आलेले निवेदन नायब तहसीलदार राहुल बनसोडे यांनी स्विकारले. निवेदनात म्हटले आहे की, पैठण तालुक्यातील रखडलेल्या ब्रम्हगव्हाण उपसा सिंचन योजना मार्गी लावा. पैठण शहरातील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा अर्धवट विकास पूर्ण करण्यात यावा. 

जायकवाडी सिंचन प्रकल्पातील कालवा आधुनिकीकरण व डाव्या कालव्याचे अस्तरीकरण याबाबत शासनाने केलेली घोषणा, मंजूर निधी, झालेला खर्च व आजपर्यंतची प्रत्यक्ष प्रगती जनतेसमोर जाहीर करून रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. जायकवाडी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पैठण तालुक्यातील शेतीसाठी नियमित व पुरेसा सिंचन पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यात यावा. पैठण तालुक्यातील सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पैठण तालुका तातडीने दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई, कर्जमाफी, कर्जसवलत, वीजबिल सवलत व इतर शासकीय मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी. पैठण तालुक्यातील दुष्काळग्रस्त व पाणीटंचाईग्रस्त गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासह कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याच्या उपाययोजना करण्यात याव्यात. पैठण तालुक्यातील गावांमधील प्रलंबित पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. 

पैठण तालुक्यातील प्रमुख जिल्हा व ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती व मजबुतीकरण करून वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यात यावी. पैठणच्या धार्मिक व ऐतिहासिक पर्यटनस्थळांचा एकत्रित विकास करून पर्यटनाला चालना देण्यात यावी.

बिडकिन येथील डिएमआयसीसी अंतर्गत ऑरीक औद्योगिक शहराचा विकास तातडीने पूर्ण करावा. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात. पैठण शहर व तालुक्यातील सांडपाणी, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात याव्यात. 

पैठण तालुक्यातील आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात यावी. पैठण तालुक्यातील प्रलंबित सर्व शासकीय विकासकामांचा कालबद्ध आढावा घेऊन त्यांची कामनिहाय सद्यस्थिती जाहीर करण्यात यावी. 

 यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य आप्पासाहेब सोलाट, शिवसैनिक गणेश शेळके, सुमित त्रिभुवन, मंगेश काळे, यश वंजारी, सम्राट वानोळे, शेख मुनाफ, संदीप परदेशी, अजय पाथरे व राम माने आदी उपस्थित होते.