सिल्लोड मतदार संघातील आरोग्य सुविधा सक्षम व बळकट करण्याची मागणी

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : सोयगाव विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम व बळकट करण्याच्या दृष्टीने आमदार अब्दुल सत्तार यांनी मुंबई येथे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मतदारसंघातील आरोग्य व्यवस्थेच्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी आमदार प्रदीप जैस्वाल तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत सिल्लोड येथील १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, सोयगाव येथील ५० खाटांचे ग्रामीण रुग्णालय तसेच फर्दापूर, अंभई, अजिंठा, भराडी, गेवराई सेमी, अंधारी आदी प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये भेडसावणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. 

विशेषतः डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता, आवश्यक पदनिर्मिती, अद्ययावत यंत्रसामग्रीची गरज, तसेच रुग्णांना दर्जेदार उपचार मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधांबाबत सविस्तर मांडणी करण्यात आली. आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक
उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जे दार आणि वेळेवर वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

यावर मंत्री प्रकाश आबीटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसोबत लवकरच आढावा बैठक घेण्यात येईल. आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दिले.