पैठण, (प्रतिनिधी) : गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नाथ सागर जलाशयाच्या पायथ्याशी असलेल्या पूलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नाथषष्ठी यात्रेपूर्वी या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी सामाजिक संघटनेच्या वतीने तसेच उद्यान विकास समितीतर्फे करण्यात आली आहे.
नाथषष्ठी यात्रा अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून ६०० च्या वर दिंड्याद्वारे जवळपास नऊ ते दहा लाख वारकरी भाविक येत असतात. यामध्ये पुणे, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातील शेकडोच्या संख्येने दिंड्या नाथ सागर जलाशयाच्या पायथ्याशी असलेल्या पुलावरून पैठण शहरात दाखल होतात. परंतु महापुरामुळे या पुलाचे सिमेंट काँक्रीटचे स्थर तसेच पोल पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहे.
पुलावर ठिकठिकाणी मोठमोठे तडे गेले असल्याने वाहनाद्वारे येणाऱ्या दिंड्यांना याचा मोठा त्रास होणार आहे तसेच या पडलेल्या भेगामुळे वाहनांचा तोल जाऊन दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोदावरी पाटबंधारे विभागाने तत्काल या पुलाची दुरुस्ती करावी जेणेकरून यात्रेकरू भाविकांना याचा त्रास होणार नाही.















