खत विक्रीची पूर्वीप्रमाणे ऑफलाईन प्रक्रिया सुरू करण्याची मागणी

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील शेतकऱ्यांना खत खरेदी करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता खत विक्रीची पूर्वीप्रमाणे ऑफलाईन प्रक्रिया सुरू करावी, तसेच खत साठा व वितरणाबाबत माहिती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी तालुका कृषी अधिकारी, सिल्लोड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, सध्या खत विक्रीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन प्रणालीमुळे शेतकरी व कृषी सेवा केंद्र चालकांना विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नेटवर्क समस्या, क्यूआर कोड स्कॅनिंगमधील अडथळे, बायोमेट्रिक पडताळणीतील त्रुटी आणि तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध होत नाही. 

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी खत विक्रीची प्रक्रिया अधिक सुलभ करणे आवश्यक आहे. ऑनलाईन प्रणालीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होईपर्यंत पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने खत विक्री सुरू करण्यात यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध होऊन पेरणीची कामे सुरळीत पार पडतील. 

तसेच तालुक्यात युरिया, डीएपी, एनपीके, एसएसपी, एमओपी आदी खतांचा किती साठा उपलब्ध आहे याची माहितीही जाहीर करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी भाजपा भवन मंडळ अध्यक्ष एकनाथ हिवाळे, ईश्वर कुंटे व भाऊसाहेब उबाळे यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून तात्काळ योग्य निर्णय घेण्याची मागणी केली.