दानवे यांच्या मंत्रिपदाचा जल्लोष शिवसेनेच्या जखमेवर मीठ चोळणाराच !

Foto

औरंगाबाद: जावयाच्या बंडखोरीने शिवसेनेचा बालेकिल्ला अन मराठवाड्याची राजधानी असलेल्या जिल्ह्यात एमआयएमचा खासदार निवडून आल्याने शिवसेनेत अस्वस्थता आहे. खैरेंचा पराभवाला भाजप जबाबदार असल्याचाही आरोप होतोय. अशावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना केंद्रात मंत्रीपदी बढती अन भाजपने शहरात ठिकठिकाणी केलेला जल्लोष सेनेच्या जखमेवर मीठ चोळणारच ठरला, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

 लोकसभा निवडणुकीचे पडसाद अजूनही शहरात उमटत आहेत. चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाला भाजप जबाबदार असल्याची भावना शिवसैनिकांत आहे. पराभवानंतर खैरे यांनीही आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती. भाजपच्या नेत्यांची तक्रार थेट उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत करण्यात आले तर प्रदेशाध्यक्षांची तक्रार त्यांनी थेट अमित शहा यांच्या कानावर घातली होती. त्यानंतर भाजप- सेनेतील हा दुरावा दूर करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली होण्याची शक्यता राजकीय मंडळी व्यक्त करीत असताना प्रदेशाध्यक्षांची वर्णी थेट केंद्रीय मंत्रीपदी लागली. दानवे यांच्या मंत्रिपदाचा शहर व जिल्ह्यात भाजपाने मोठा जल्लोष केला. सिडको, गारखेडा, उस्मानपुरा, गुलमंडी येथे फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मोठ मोठे स्क्रीन उभारून शपथविधी सोहळ्याचे थेट प्रसारण दाखविण्यात आले. भाजपमध्ये जल्लोष असताना शिवसेनेत मात्र शांतता होती. सेनेचा एकही नेता भाजपच्या जल्लोषात सहभागी झाला नाही. खैरेंच्या पराभवाचे शल्य सैनिकांना बोचत असताना भाजपचा हा जल्लोष सेनेला मुळीच रूचला नाही. भाजपचा हा जल्लोष सेनेच्या जिव्हारीच लागणार ठरला, यात शंका नाही.

खैरेंना मंत्रीपदाची आशा 
गेल्या सरकारात मंत्रिपदासाठी तब्बल पाच वर्ष खैरे वेटिंगवर होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर खैरेंनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली होती. त्यानंतर खैरेंना राज्यसभेवर घेऊन केंद्रीय मंत्रीपदाची वर्णी लागणार असल्याचे मेसेज जिल्हाभर फिरले. मराठवाड्यात शिवसेनेचा गड असलेल्या औरंगाबादेतून खैरे यांना मंत्रिपद मिळाले तर शिवसेना बळकट करण्यास फायदा होईल, असा मतप्रवाह सेनेत आहे. भाजपचे वर्चस्व कमी करून मराठवाड्यात सेनेला बळ देण्यासाठी पक्षाला केंद्रीय मंत्रीपदाची गरज असल्याचेही बोलले जाते.  या सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार येत्या महिनाभरात अपेक्षित आहे, त्यावेळी तरी आपली वर्णी लागेल, अशी आशा खैरे यांना आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker